Join us

मिठी नदीत पूररोधक दरवाजे उभारण्यासाठी वारेमाप खर्च का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2023 11:51 AM

पालिका प्रशासनावर टीका, नदीला आले नाल्याचे स्वरूप

मुंबई : समुद्रातील पाणी मिठी नदीद्वारे पुन्हा शहरात येऊ नये यासाठी पालिका २३ ठिकाणी पूररोधक दरवाजे उभारणार आहे. त्यासाठी पालिका तब्बल दोन हजार कोटी खर्च करणार असून, मिठी नदीच्या विविध कामांसाठी यापूर्वीच दीड हजार कोटी यापूर्वीच पालिकेने खर्च केलेले आहेत. या पार्श्वभूमीवर मिठी नदीत पूररोधक दरवाजे उभारण्यासाठी इतका अवाढव्य खर्च कशासाठी, अशी टीका आता करण्यात येत आहे.

२६ जुलै २००५ च्या पावसात अख्खी मुंबई पाण्याखाली गेली होती. त्यावेळी मिठी नदीच चर्चेचा विषय बनली होती. मुंबईतल्या प्रमुख नद्यांपैकी एक नदी म्हणून मिठी नदी ओळखली जाते. 

मुंबईचे सांडपाणी मिठी नदीत सोडले जाते. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकसह विविध प्रकारचा करचा मिठी नदीत टाकला जातो. परिणामी, अनेक भागांत मिठी नदी अक्षरश: तुंबते. विविध भागांत कचरा अडकून मुसळधार पावसात मिठीला पूर येतो. मुंबईतील सांडपाणी मिठी नदीत सोडले गेल्यामुळे मिठी नदीला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. 

कुठे उभारणार दरवाजे?विहार तलावापासून माहीम खाडीपर्यंत नदी विस्तारली असून ही नदी अंधेरी, वांद्रे, कुर्ला परिसरातून जाते. पाऊस झाला की, या मार्गावर अनेक भागांत नदीला पूर येतो. त्यामुळे सखल भाग पाण्याखाली जातात. त्यामुळे या मार्गावर पूररोधक दरवाजे उभारण्यात येणार आहेत. 

पालिकेने २०१९ मध्ये मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला असून नदीची वहन आणि धारण क्षमता वाढविण्यात येणार आहे.

२६ जुलै २००५ च्या पावसात मिठी नदीला पूर आल्यानतंर मुंबईतील अनेक भागांत पाणी तुंबले, त्यानतंर पालिकेने मिठी नदीचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २००५ पासून आतापर्यंत मिठी नदीच्या विकासासाठी तब्बल दीड हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तरीही मिठी नदी नाल्याप्रमाणेच वाहत असल्याचे चित्र आहे.

पूररोधक दरवाजे उभारण्यासाठी दोन हजार कोटींचा खर्च जास्त असून, या कामावर लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांचे म्हणणे आहे. महापालिकेतील नगरसेवकांची मुदत संपल्यापासून प्रत्येक काम अधिकारी आणि कंत्राटदारांच्या संगनमताने सुरू असल्याचा आरोपही रवी राजा यांनी केला आहे.

तसेच पूररोधक दरवाजे उभारण्यासाठीच्या कामाच्या निविदा प्रक्रियेपासून ते कार्यादेश देण्यापर्यंतच्या सर्व कामावर देखरेख ठेवण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :मुंबई