डेंग्यूमुळे दोन आठवडे विश्रांती घेत असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तब्येत सुधारताच शुक्रवारी दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत तासभर चर्चा केली. तत्पूर्वी प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतल्यामुळे उत्सुकता निर्माण झाली. अमित शाहांच्या भेटीवर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. दरम्यान, आता या भेटीत काय झाले याची माहिती अजित पवार गटातील मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली.
"शरद पवार अन् अजितदादांच्या भेटीत अनेक रहस्य, ते लवकरच..."; रवी राणांनी केला दावा
मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले की, महामंडळ, मंत्रिमंडळाचा विस्तार हा आताच झाला पाहिजे. त्यामुळे लोकसभेचे टारगेटही पूर्ण होईल. महायुतीच्या जागा जास्त येतील. अजितदादांनी काल अमित शाहांची घेतलेली ही भेट या संदर्भातच असणार आहे. आम्ही राष्ट्रवादीतील सर्व पक्ष म्हणून एकत्र राहिले पाहिजे. दादा आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्र यायला पाहिजे, असं माझं मत आहे, असंही मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले.
"शरद पवार साहेब हे आमचे नेते आहेत, त्यांचा आशिर्वाद आमच्यासोबत असावा असं आमचं मत आहे. सर्वांच्या भेटीगाठी होत असतात. अमित शाह आणि अजितदादांच्या चर्चा काय झाली माहित नाही. राजकीय चर्चा झाल्या असतील, असंही मंत्री आत्राम म्हणाले.
शुक्रवारी सायंकाळी अजित पवार, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अमित शाह यांच्या ८, कृष्ण मेनन मार्ग येथील निवासस्थानी पोहोचले आणि त्यांच्यासोबत तासभर गुफ्तगू केले. ही बैठक संपताच अजित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांचे २६, गुरुद्वारा रकाबगंज गाठले. तिथे त्यांनी ज्येष्ठ विधिज्ञांशी दीर्घ चर्चा केली.
अमित शाह यांच्यासोबत अजित पवार, तटकरे आणि पटेल यांच्यात बैठक सुरू असताना टेबलवरील अनेक फाइल्सही लक्ष वेधून घेणाऱ्या ठरल्या. या फाइल्समध्ये नेमके काय दडले आहे याचीही त्या निमित्ताने चर्चा सुरू होती.