मुंबई
दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी अखेर तिच्या आई-वडिलांनी आज पुन्हा एकदा माध्यमांसमोर येऊन संपूर्ण माहिती दिली. दिशा सालियनच्या आत्महत्येवरुन सुरू असलेलं राजकारण थांबवावं आणि आम्हालाही जगू द्यावं, अशी विनंती दिशाच्या आई-वडिलांनी केली आहे. यावेळी दिशाच्या आईला अश्रू अनावर झाले होते. दिशावर आरोप करण्याचा आणि तिला बदनाम करण्याचा हक्क राजकारण्यांना कुणी दिला? आता ती आमच्यात नाही. पण राजकारणी त्यांच्या फायद्यासाठी तिची बदनामी करुन आम्हाला त्रास देत आहेत. आम्हीही तणावात असून आम्हालाही आत्महत्या करावीशी वाटतेय आणि जर हे थांबलं नाही तर आम्हीही टोकाचं पाऊल उचलू. यासाठी राजकारणीच जबाबदार असतील असं दिशाच्या आईनं सांगितलं.
दिशानं कामाच्या तणावातून आत्महत्या केल्याचं तिच्या आईनं यावेळी स्पष्टच सांगितलं. "दिशाच्या आत्महत्येवरुन वेगवेगळे आरोप केले आहेत. पण त्यात काहीच तथ्य नाही. ती कामाच्या तणावात होती. तिची एक व्यावसायिक डील रद्द झाली होती आणि त्याच्या तणावात ती होती. पण त्यावेळी आम्ही तिचं म्हणणं इतकं मनावर घेतलं नाही. त्यानंतर तिच्या आणखी दोन मोठ्या डील रद्द झाल्या होत्या. याचाच तिच्यावर तणाव होता आणि तिनं हे टोकाचं पाऊल उचललं. ती मनानं खूप हळवी होती. तिचा पोस्टमार्टम अहवाल देखील पोलिसांकडे आहे आणि तिनं आत्महत्या केल्याचं त्यातून समोर आलं आहे. तरीही आम्ही ज्यांना मतदान करतो तेच आमच्या मुलीची बदनामी करत आहेत हे पाहून खूप दु:ख होतं", असं दिशाच्या आईनं म्हटलं.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज दिशा सालियनच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर दिशा सालियनच्या मातोश्री आणि वडिलांनी एक लेखी तक्रारपत्र किशोरी पेडणेकर यांच्याकडे दिलं. दिशाची बदनामी होत असल्याची तक्रार सालियन यांच्या मातोश्रींनी महिला आयोगाकडे केली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले सर्व पुरावे तयार...दिशा सालियन प्रकरणाचा सविस्तर उलगडा होणार असून त्या संबंधित सर्व पुरावे तयार आहेत, असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसंच दिशा सालियन प्रकरणाची सर्व माहिती ७ मार्च रोजी सर्वांसमोर येईल असाही दावा पाटील यांनी केला आहे.