मुंबई, दि. 19 - मातृभाषेतून शिकल्यास बालकांना विषयाचे आकलन लवकर होते. हे आपण पदोपदी अनुभवत असतो. अगदी मोठ्या माणसांनादेखील इंग्रजी आणि मराठी मजकुर समोर ठेवला तरी मराठी मजकूर वाचण्याला पसंती दिली जाते. याला कारण मराठी आपली मातृभाषा असते आणि त्यातून वाचल्यास, शिकल्यास चांगल्या पद्धतीने समजते, पाठांतर कमी करावे लागते. युनेस्को, ब्रिटिश कौन्सिल देखील मातृभाषेतून शिक्षणाचेच समर्थन करतात.
मातृभाषेतून शिकल्यास आपल्या संस्कृतीशी, पूर्वजांशी नाळ पक्की होते. उदा. मराठी शाळेत अनेक वेगवेगळे मराठी सण साजरे केले जातात, स्नेह संमेलनात मराठी संस्कृतीवर आधारीत कार्यक्रम असतात, अवांतर गप्पा-गाणी-गोष्टी मराठीतून होतात. इतिहासाच्या पुस्तकात महाराष्ट्राचा इतिहास , भूगोलाच्या पुस्तकात महाराष्ट्राचा भूगोल मराठीतून शिकवला जातो. आपल्याला शिवाजीच्या आयुष्याचा थरार अनुभवायचा असेल तर शिवाजी मराठीतूनच वाचला पाहिजे, शिवाजी जोपर्यंत आपल्या मेंदूवर गारुड करत नाही तोपर्यंत शिवाजीचे अनुसरण आपण करू शकणार नाही. आणि त्यासाठी शिवाजी मराठीतून शिकायला हवा कारण मराठी आपली मातृभाषा आहे.
मातृभाषा पक्की असेल तर दुसरी भाषा शिकणे सोपे इंग्रजी शिकण्याकरता प्रथम तुम्हाला मराठी शिकणे गरजेचे आहे कारण, ती तुमची मातृभाषा आहे! ऐकून आश्चर्य वाटलं ना? होय! हेच खरं आहे. शब्द, वाक्यरचना, नाम, सर्वनाम, क्रियापद, क्रियाविशेषण अशा अनेक व्याकरणातल्या संकल्पना अगोदरच पक्क्या झालेल्या असतील तर वेगवेगळ्या भाषा शिकणे अवघड जात नाही कारण, सर्व भाषांचा संकल्पनात्मक आधार एकच असतो. म्हणूनच मूलगामी अर्थाने आपण भाषा एकदाच शिकतो असे म्हटले जाते. त्यामुळे आपल्या मुलांना प्रथम भाषा, मातृभाषा-मराठी चांगली बोलता-लिहिता-वाचता येणे गरजेचे आहे.
सर्वात शेवटी मी सांगेन की, मला माझ्या मुलीसाठी आनंददायी शिक्षण हवे आहे. तिला अशा शाळेत पाठवायचे होते जिथे मराठीतून बोलल्यास शिक्षा होत नाही, दंड होत नाही, जिथले शिक्षक शिक्षण शास्त्राची पदवी घेतलेले असतील. मातृभाषेतून शिकल्यास आकलन व्हायला एकूण वेळ कमी लागतो, म्हणजेच अभ्यास लवकर होतो, राहिलेला वेळ इतर छदांसाठी देता येऊ शकतो.
आज असंख्य खाजगी इंग्रजी शाळा विनानुदानीत आहेत. आपण लहान असताना आपल्या शाळा वेगवेगळ्या जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये भाग घेत. कथाकथन, नाट्यवाचन, नाट्यसंगीत, क्रीडा स्पर्धा, इ. पण अनेक इंग्रजी शाळा अशा स्पर्धामध्ये भाग घेत नाहीत. त्यांच्या केवळ त्या शाळेपुरत्या अंतर्गत स्पर्धा असतात जे मला आवडत नाही. स्पर्धा माणसाला घडवत असते. स्पर्धाच नसेल तर आपण काय वेगाने प्रगती करतोय, अजून किती सराव, अभ्यास करायला हवा याचा अंदाज येत नाही. स्पर्धेतील सहभागाने आत्मविश्वास वाढतो, ज्याचा उपयोग व्यक्तिमत्त्व विकासाकरता होतो.
त्यामुळे माझ्या मुलीच्या सर्वांगीण विकासाकरता मी मराठी शाळाच निवडली.