लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : फसवणुकीच्या गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी तपास अधिकाऱ्याला तीन वर्षे का लागली, असा प्रश्न उच्च न्यायालयाने सोमवारी विचारत पोलीस उपायुक्तांना याप्रकरणी चौकशी करत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश सोमवारी दिले. सदर पोलीस अधिकारी बोरिवली पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षकपदी कार्यरत आहे.
बोरिवली पोलीस ठाण्यात ५१५/२०१८ हा दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात एका मुखत्यारपत्राप्रकरणी आरोप करण्यात आले होते. मात्र तीन वर्षे होऊनसुद्धा याप्रकरणी चौकशी पूर्ण करून आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. त्यानुसार आरोपीचे वकील विशाल सत्यप्रकाश सक्सेना यांनी याबाबत काही प्रश्न उपस्थित केले. त्यानुसार या प्रकरणाच्या चौकशीत विलंब करण्यात आल्यासोबतच या मुखत्यारपत्राचा कोणताही चुकीचा वापर करण्यात आला नाही, असेही त्यांनी न्यायालयाला सांगितले. त्यानुसार उच्च न्यायालयाने याप्रकरणी परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांना चौकशी करून दोन आठवड्यात याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.