धारावी प्रकल्पाबाबत मविआला आत्ताच का जाग आली?; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 12:25 PM2023-12-18T12:25:05+5:302023-12-18T12:25:44+5:30
महाविकास आघाडीला आज का जाग आली? जाहिरात येऊन ८-१० महिने झाले मग आज मोर्चा का काढला असं राज यांनी विचारले.
मुंबई - मी बीडीडी चाळीच्या इथं पाहणीला गेलो होतो तेव्हा तुम्हाला आठवत असेल तर मी विचारलं होतं, तिथे शाळा किती, रस्ते कसे होणार, किती इमारती होणार, टाऊन प्लॅनिंग काय आहे हे सांगावं लागते. एक मोठा भाग घेतला आणि अदानींना दिला असं थोडी असते. १० महिन्यांनी जागे झालेल्या महाविकास आघाडीने धारावीत नेमके काय होणार हा प्रश्न विचारला का? मोर्चाचे दबाव आणून सेटलमेंट करायचे आहेत का हे मविआ नेत्यांना विचारा अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या धारावी मोर्चावर दिली. लोकसभा निवडणुकीबाबत घेतलेल्या आढावा बैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राज ठाकरे म्हणाले की, मुंबईत जो मोठा प्रकल्प येतोय तो परस्पर अदानींना का दिला इथपासून याची सुरुवात होते. अदानींकडे असं काय आहे, म्हणजे विमानतळ, कोळसा खाणी यासारख्या बाकीच्या गोष्टी तेच हाताळू शकतात. एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी टाटांसारख्या अनेक बड्या कंपन्यांकडून तुम्ही टेंडर मागवायला हवी होती. डिझाईन मागवायला हवे होते. तिथे नेमके काय होणार हे कळायला हवे होते पण हे झाले नाही. आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत माझी बोलणी झाली होती. अदानी ग्रुपच्या प्रतिनिधींनाही मला तुमचे डिझाईन दाखवा असं बोललो होतो. मला फक्त प्रश्न एवढा आहे की महाविकास आघाडीला आज का जाग आली? जाहिरात येऊन ८-१० महिने झाले मग आज मोर्चा का काढला. की सेटलमेंट नीट होत नाही म्हणून? कशासाठी मोर्चा काढला? असा सवाल राज यांनी विचारला.
मेरी मर्जी असा कारभार सुरू
आज आमची लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा झाली. कोणते मतदारसंघ लढवावेत, कोणते नाही याबाबत सखोल चर्चा झाली. त्यानंतर पुढील वर्षी लोकसभा निवडणूक जाहीर होतील तेव्हा कोणते मतदारसंघ लढवायचे हे जाहीर केले जाईल. २०२५ ला महापालिका निवडणुका होतील. निवडणूक आयोग आणि कायदा वैगेरे आता काहीच नाही. मेरी मर्जी असा कारभार सुरू आहे अशा शब्दात राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.