शरद पवारांनी अनिल देशमुखांची गृहमंत्रिपदी निवड का केली होती?; जाणून घ्या यामागचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 03:43 PM2021-03-21T15:43:24+5:302021-03-21T15:54:00+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार जाहीर खातेवाटप जाहीर झालं तेव्हा गृहमंत्रिपद कुणाला मिळणार, याकडे सगळ्यांचं लक्ष होतं.
मुंबई: सचिन वाझे प्रकरणानंतर (Sachin Vaze Case) मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून झालेल्या उचलबांगडीनंतर परमबीर सिंह (Parambeer Singh) यांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर विरोधकांकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार (Sharad Pawar) यांना अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या भवितव्याबाबत विचारले असता त्यांनी याबाबत मोघम उत्तर देऊन वेळ मारून नेली.
अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत विचारलेल्या पत्राला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर पत्राच्या माध्यमातून केलेले आरोप गंभीर आहेत. मात्र याबाबत अनिल देशमुख यांचीही बाजू जाणून घेतली पाहिजे. त्यांच्या राजीनाम्याबाबत आम्ही सर्वांशी बोलून निर्णय घेऊ. याबाबतचा निर्णय हा उद्यापर्यंत होऊ शकेल. असे असले तरी याबाबतचा अंतिम निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतील, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
अनिल देशमुख यांचा राजकीय प्रवास आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार जाहीर खातेवाटप जाहीर झालं तेव्हा गृहमंत्रिपद कुणाला मिळणार, याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. राष्ट्रवादीचे काटोलचे आमदार अनिल देशमुख यांच्या खाद्यांवर गृहमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. एकीकडे अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील अशा दिग्गजांची फळी राष्ट्रवादीत असताना शरद पवार यांनी गृहमंत्रिपद अनिल देशमुखांकडे दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं गेलं होतं.
शरद पवारांनी अर्धसत्य सांगितलं; फडणवीसांनी सांगितला 'त्या' घटनेचा पुढील भाग https://t.co/ONWWP5etrL
— Lokmat (@MiLOKMAT) March 21, 2021
अनिल देशमुख हे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या जवळचे आहेत आणि पटेल हे शरद पवारांच्या विश्वासातले आहेत. अनिल देशमुखे सौम्य स्वभावाचे व्यक्तिमत्त्व आहे. सगळ्यांशी त्यांचा नीट संवाद होऊ शकतो, याचा विचार करण्यात आला. त्यानंतर त्यांना गृहमंत्रिपद देण्यात आलं, असं सांगण्यात येत आहे. अनिल देशमुख हे शरद पवार यांच्या विश्वासातले आहेत. जसं छगन भुजबळ आहेत. मात्र, एकवेळ भुजबळ स्वतंत्ररीत्या निर्णय घेऊ शकतात, पण अनिल देशमुख पवारांशी बोलल्याशिवाय निर्णय घेणार नाहीत, असं राजकीय विश्लेषक सांगतात.
दरम्यान, 'मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी यांचा सहभाग स्पष्ट हेत असताना त्याचे धागेदोरे परमबीर सिंग यांच्यापर्यंत पोहचणार असल्याचं तपासातून स्पष्ट होत असताना परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी आणि कारवाईपासून वाचण्यासाठी खोटा आरोप केला आहे', अशी अनिल देशमुख यांनी आपली बाजू ट्वीटरवर मांडली आहे.
प्रसिद्धी पत्रक pic.twitter.com/4qh5ZIP9GD
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 20, 2021
अनिल देशमुख यांनी आतापर्यंत सांभाळलेली मंत्रिपदं-
1995 (युती सरकार) - कॅबिनेट मंत्री, शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, सांस्कृतिक कार्य
1999 (आघाडी सरकार) - राज्यमंत्री, शालेय शिक्षण, माहिती व जनसंपर्क
2001 (आघाडी सरकार) - कॅबिनेट मंत्री, राज्य उत्पादन शुल्क, अन्न व औषधीद्रव्य प्रशासन
2004 (आघाडी सरकार) - कॅबिनेट मंत्री, सार्वजनिक बांधकाम
2009 (आघाडी सरकार) - कॅबिनेट मंत्री, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण