टोमॅटोचे भाव का कोसळले?; अशी वेळ येण्यामागचं नेमकं कारण काय, जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 10:41 AM2021-09-01T10:41:56+5:302021-09-01T10:42:03+5:30
गेल्या काही दिवसांपासून टोमॅटो प्रचंड रुसला आहे.
गेल्या काही दिवसांपासून टोमॅटो प्रचंड रुसला आहे. बाजारात टोमॅटोला काही किंमतच राहिली नसल्याने त्याचा मालकही वैतागला आहे. कुठे रस्त्यावर फेक, कुठे शेतातच त्याचा चिखल अशी ‘घर का ना घाट का’ व्यवस्था झाली आहे टोमॅटोची. पण अशी वेळ का यावी या पिकावर. पाहू या...
टोमॅटोच्या दरांची तुलना
देशातील सर्वात मोठे टोमॅटो खरेदी-विक्री आगार असलेल्या देवासमध्ये (मध्य प्रदेश) गेल्या वर्षी टोमॅटो ११ रुपये प्रतिकिलो दराने विकला गेला होता. यंदा हाच दर ८ रुपये प्रतिकिलो असा आहे. जळगावात गेल्या वर्षी याच काळात २१ रुपये प्रतिकिलोने टोमॅटोचा व्यवहार झाला होता. यंदा मात्र अवघा ४ रुपये किलोने टोमॅटो विकला गेला आहे.
औरंगाबादमधील दर : ९.५० रु. (२०२०), ४.५० रु. (२०२१)
कोल्हापुरातील दर : २५ रु. (२०२०), ६.५० रु. (२०२१)
सोलापूरमधील दर : १५ रु. (२०२०), ५ रु. (२०२१)
इतर राज्यांतील चित्र
२०२० २०२१
कर्नाटक १८.७० रु. ५.३० रु.
आंध्र प्रदेश ४० रु. १८ रु.
उत्तर प्रदेश २८ रु. ८ रु.
प. बंगाल ३४ रु. २५ रु.
दिल्ली ३६ रु. २४ रु.
अतिपिकामुळे नुकसान
यंदाच्या वर्षात अतिपीक झाल्याने टोमॅटोचे भाव गडगडले. पुरवठा अधिक तर किंमत कमी या बाजाराच्या नियमानुसार हे झाले. देशभरातील ३१ केंद्रांपैकी २३ केंद्रांवर टोमॅटोच्या दरांत गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्म्याने घसरण नोंदविण्यात आली.
उपाय काय?
आता अन्नप्रक्रिया क्षेत्रातील कंपन्यांनी पुढे येऊन टोमॅटोची रास्त भावात खरेदी करावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.