Join us  

खासदारकीच्या हॅट्ट्रिकवर असलेले राहुल शेवाळे का हरले?

By मनोज गडनीस | Published: June 06, 2024 6:56 AM

उद्धव सेनेला मिळालेल्या सहानुभूतीनेही शेवाळेंच्या पराभवात मोठी भूमिका बजावली, असे निरीक्षण आहे.  

मुंबई : धारावी, अणुशक्तीनगर या दोन विधानसभा मतदारसंघांतील मुस्लीम समाजाची तसेच अन्य भाषिक कष्टकरी वर्गाची एक गठ्ठा मते उद्धव सेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या पारड्यात पडल्यामुळे मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघात सलग दोनदा खासदार राहिलेल्या राहुल शेवाळेंचा पराभव झाल्याचे म्हटले जाते.  

वास्तविक, जनतेचा नेता किंवा मतदारसंघातील नागरिकांसाठी कायम उपलब्ध होणारा लोकप्रतिनिधी अशी शेवाळे यांची मतदारसंघातील ओळख आहे. मात्र, मतांचे विभाजन आणि गेल्या निवडणुकीच्या तुलनेत एक टक्का कमी झालेले मतदान हे देखील त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याचे मानले जाते. उद्धव सेनेला मिळालेल्या सहानुभूतीनेही शेवाळेंच्या पराभवात मोठी भूमिका बजावली, असे निरीक्षण आहे.  

मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघात धारावी, वडाळा, शीव-कोळीवाडा, माहीम, चेंबूर, अणुशक्तीनगर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांत धारावी आणि अणुशक्तीनगरमधून अन्य भाषिक कष्टकरी वर्गाने शेवाळेंच्या पारड्यात मते टाकली होती.

शिवाय, या सहाही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची स्वतःची हक्काची अडीच लाख मते आहेत. मात्र, शिवसेनेतील फुटीनंतर पारंपरिक मतांचेही मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण झाले. त्यात उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाल्यामुळे शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांपैकी एक गठ्ठा मतदारांनी अनिल देसाई यांच्या बाजूने उभा राहिल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांचे निरीक्षण आहे. 

सर्वेक्षणाचे गूढ कायमराहुल शेवाळे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर काही महिन्यांनी एक सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात शेवाळेंचा शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय योग्य होता का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, या सर्वेक्षणातून शेवाळेंच्या हाती नेमके काय लागले? आणि काही लागले असेल तर त्याआधारे त्यांनी आपल्या निवडणूक रणनीतीमध्ये काही बदल केला होता का, हे गूढ आहे.

पांढरपेक्षा मतदारांकडून अपेक्षाभंग?माहीम आणि वडाळा या दोन विधानसभा मतदारसंघांतील पांढरपेशा मतदारही यावेळी अनिल देसाई यांच्याकडे झुकल्याचे दिसले. या मतदारांनीही शेवाळेंना अपेक्षित मतदान केले नसल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

धारावी पुनर्विकासाचा मुद्दा धारावी पुनर्विकासावरून विरोधी पक्षांनी जे मुद्दे उपस्थित करून रान उठवले ते खोडून काढण्यात किंवा धारावीकरांच्या मनातील प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्यात शेवाळे यांची टीम अपयशी ठरल्याचे बोलले जाते. या लोकसभा मतदारसंघात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचे निवासस्थान आहे. मात्र, शेवाळेंच्या प्रचारात मनसेच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती फारशी नव्हती.

टॅग्स :राहुल शेवाळेमुंबई दक्षिण मध्यलोकसभा निवडणूक २०२४ निकालमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४