राज ठाकरेंना मतदानास विलंब का झाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 05:16 AM2019-07-10T05:16:13+5:302019-07-10T05:17:07+5:30
मुख्य निवडणूक आयुक्तांनी मागवला राज्याकडून खुलासा
मुंबई : पुढे केवळ २0 मतदार रांगेत उभे असताना आपल्याला मतदान करण्यासाठी तब्बल दोन तास प्रतीक्षा करावी लागली, व्हीव्हीपॅटमुळे तसे घडले अशी तक्रार मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे सोमवारी दिल्लीत केल्यानंतर मुख्य आयुक्तांच्या कार्यालयाने मंगळवारी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे याबाबत खुलासा मागविला.
ठाकरे यांनी काल नवी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन मतदान प्रक्रियेसंदर्भात काही तक्रारी केल्या होत्या. मतदानात पारदर्शकता आणि विश्वासार्हता आणण्यासाठी ईव्हीएमद्वारे मतदान घेण्याऐवजी पूर्वीसारखा मतपत्रिकांचा वापर करावा, अशी मागणीही ठाकरे यांनी केली होती. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क, दादर येथील बालमोहन विद्यामंदिर या मतदान केंद्रावर सहकुटुंब जाऊन मतदान केले होते. ईव्हीएमवरील मतदानाची खात्री करून घेण्यासाठी वापरण्यात येणाºया व्हीव्हीपॅटमुळे मतदान प्रक्रिया कमालीची रेंगाळली आणि त्यामुळे केवळ २0 मतदार आपल्यापुढे असताना दोन तास वाट पाहावी लागली, असे ठाकरे यांचे म्हणणे होते.
विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, मुख्य निवडणूक आयुक्तांना करून खुलासा मागविल्यानंतर राज्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंदर्भातील अहवाल मागविला आहे. त्याआधारे मुख्य निवडणूक आयुक्तांकडे खुलासा पाठवला जाईल.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी सांगितले की, मतदानासाठी पुढे २0 मतदार असतील तर एकविसाव्या व्यक्तीचा मतदानासाठी नंबर येण्यास फार तर एक तास लागू शकतो. व्हीव्हीपॅटमुळे मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यास पूर्वीपेक्षा अधिक कालावधी लागतो ही देखील वास्तविकता आहे.