Join us

वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2024 5:20 AM

२५-३० वर्षे मुंबई पालिकेवर सत्ता गाजवणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी मुंबईतला मराठी माणूस वसई-विरार पलीकडे का गेला याचे उत्तर द्यावे, असे आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार देशात आणि राज्यात आल्यानंतर २०१४ नंतर बदललेली मुंबई पाहत आहोत. वरळीच्या बीडीडी चाळीत फुटाच्या १२० घरात राहणाऱ्या रहिवाशांना ६०० चौरस फुटांचे घर आम्ही देत आहोत. पोलिस, गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न सोडवला, मात्र २५-३० वर्षे मुंबई पालिकेवर सत्ता गाजवणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी मुंबईतला मराठी माणूस वसई-विरार पलीकडे का गेला याचे उत्तर द्यावे, असे आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शिंदे सेनेच्या दक्षिण मुंबईतील लोकसभा उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचारानिमित्त जांभोरी मैदान येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभेला येणार असल्याने भाषणे लांबवण्यात आली. पण ९ वाजून ५८ मिनिटांनी शिंदे यांचे सभास्थळी आगमन झाले. आचारसंहितेमुळे शिंदे यांनी भाषण टाळून 'जय श्रीराम' च्या घोषणा दिल्या.

विकासाच्या ट्रेनमध्ये सर्वांना बसायला जागा

महायुती ही विकासाची ट्रेन आहे आणि त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मजबूत इंजिन आहे. वेगवेगळ्ळ्या पक्षांचे डबे आहेत व त्यात सर्वांना बसण्यास जागा आहे; परंतु विरोधकांच्या ट्रेनला डबे नसून सर्व नेते स्वतःला इंजिन समजतात, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी मीरा रोड येथील महायुतीच्या जाहीर सभेत लगावला. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे शिंदेसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी फडणवीस हे मंगळवारी रात्री मीरा रोड येथे आले होते. सेव्हन स्क्वेअर शाळा मैदानातील सभेत उमेदवार नरेश म्हस्के, नांदेडचे प्रताप चिखलीकर, जोगेंद कवाडे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन, माजी आमदार रवींद फाटक, नरेंद्र मेहता, अॅड. रवी व्यास, राजू भोईर, विक्रमप्रताप सिंह, किशोर शर्मा, देवेंद्र शेलेकर, संदीप राणे आदींसह महायुतीचे पदाधिकारी- कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमुंबईलोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४भाजपामहायुती