- रवींद्र बिवलकर
नेमेचि येतो मग पावसाळा, गणपती आले अन् नाचून गेले अशा कित्येक वाक्प्रचारांसारखी मुंबई-गोवा महामार्गाची दुःस्थिती गेल्या अनेक वर्षांपासून झालेली आहे. गावाला जावे तरी कसे असा प्रश्न त्यामुळे कोकणवासीयांसमोर पडतो. विशेष करून गणपती उत्सवाच्यावेळी गोवा महामार्गाची स्थिती, रस्त्यावर पडणारे खड्ड्यांवर खड्डे आणि त्यामुळे कोल्हापूरमार्गे जायचे असल्याने मार्गावरून जाताना लागणारा कमी वेळ पण टोलचा महागडा प्रश्न हा देखील निर्माण होतो.
मुळात या मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून अत्याचार केले गेले. चौपदरीकरण करा म्हणून आंदोलने झाली. स्थानिक लोकांनाही अपघात होतात म्हणून चौपदरीकरणाचा प्रश्न मार्गी लावावा यासाठी आंदोलने करण्यास उद्युक्त केले गेले होते. ते सर्व विचारात घेता चौपदरीकरण हा बनाव होता का, असाच प्रश्न आता पडतो. इतके होऊनही गेल्या दहा वर्षांपासून रखडत पडलेल्या या चौपदरीकरणाच्या कामालाही नीट रूप दिलेले नाही. कोकणाचा भौगोलिक ढाचाच अनेक ठिकाणी विचारात घेतलेला नाही.
पनवेल ते वडखळ नाका या दरम्यान झालेला मार्गही सध्या चांगल्या स्थितीत नाही. तो बरा केला गेला असे म्हटले जात होते, तेव्हा त्यावर अनेक गतीअवरोधक टाकले गेले होते. आता तो रस्ताही नीट नाही, वडखळ नाका ते इंदापूर या दरम्यानचा मार्गही चंद्रावरील खड्ड्यांचा बनला आहे.
मुळात कोकणात जाण्यासाठी नेमके काय करायला हवे होते, त्याचा एक कच्चा आराखडा नियोजनकारांनी दाखवला होता. पण तेव्हा तो प्रकल्प हाती घेतला गेला नाही. रेवस-रेड्डी या पश्चिम किनारपट्टीवरून जाणाऱ्या मार्गाचा प्रस्ताव हा गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळला आहे. गोव्यापासून पुढे दक्षिण भारतातील पश्चिम किनाऱ्यावर जसे सागराला समांतर मार्ग तयार केले गेले, तसे मार्ग महाराष्ट्रातील या प्रस्तावित पश्चिम सागरकिनारी महामार्गात दिसत नाहीत.
म्हणजेच ना धड मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदीकरण नीटपणे केले गेले आहे ना सागरकिनारपट्टी महामार्गाचा आराखडाही नीट विचारात घेतला गेला आहे. यामुळेच एकूणच देशाची सुरक्षाही पणाला लागल्यासारखा हा प्रकार आहे. अशातून शेखाडीसारखे प्रसंग भविष्यात उद्भवल्यास नवल वाटू नये.