अंधेरी येथील दरड का कोसळली? दुर्घटना घडूनही महापालिका आणि एसआरए ढिम्मच, चौकशीची केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 01:40 PM2023-08-03T13:40:42+5:302023-08-03T13:40:59+5:30

ही दरड कोसळण्यामागची कारणे जाणून घेण्यासाठी या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Why did the precipice collapse in Andheri demanded an inquiry | अंधेरी येथील दरड का कोसळली? दुर्घटना घडूनही महापालिका आणि एसआरए ढिम्मच, चौकशीची केली मागणी

अंधेरी येथील दरड का कोसळली? दुर्घटना घडूनही महापालिका आणि एसआरए ढिम्मच, चौकशीची केली मागणी

googlenewsNext

मुंबई : मागाठाणे येथील जमीन खचण्याच्या घटनेनंतर अंधेरी पूर्व भागातील चकाला परिसरात २५ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास टेकडीलगत काम सुरू असलेल्या सातमजली रामबाग सोसायटीवर दरड कोसळून तब्बल चार ते पाच फ्लॅट ढिगाऱ्याखाली गेले. मात्र एसआरए प्राधिकरण ढिम्मच असून याबाबत आवश्यक ती कारवाई टाळली जात असल्याबाबत मनसेचे अंधेरी (पूर्व) विभाग अध्यक्ष रोहन सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले आहे. ही दरड कोसळण्यामागची कारणे जाणून घेण्यासाठी या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

रामबाग सोसायटीच्या इमारतीत  तब्बल १६५ सदनिका असून अनेक नागरिक या ठिकाणी राहत आहेत. दुर्घटना घडली त्या दिवशी अचानक मोठा आवाज झाल्याने नागरिक भयभीत होऊन जागे झाले. बाहेर आल्यावर त्यांना त्यांच्या फ्लॅटपुढे दरड कोसळल्याचे दिसले.  या परिसरात असलेल्या डोंगरामधून इमारतीवर सतत माती आणि आणि दगड कोसळत असतात. या घटनेमुळे येथील नागरिक दहशतीत आहेत. नागरिकांच्या जिवाशी खेळणारे येथील बांधकाम त्वरित थांबवत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सावंत यांनी केली आहे. 

आजूबाजूच्या धोकादायक स्थितीचे सर्वेक्षण न करता चाललेल्या या प्रकल्पाचे काम त्वरित थांबवण्यात यावे. येथील मातीचे परीक्षण करून तसेच येथील भाैगोलिक स्थितीचा आढावा घेत भविष्यात दरड कोसळू शकते का, याचा आढावा घेण्यात आलेला नाही. येथील इमारतींना ताबा प्रमाणपत्र कसे देण्यात आले, याचाही शोध घेण्यात यावा. 

दुर्घटनाग्रस्तांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.    स्थानिक यंत्रणा आणि नियंत्रक प्राधिकरणांनी इमारतीचे बांधकाम आणि सुरक्षाविषयक नियमांचे येथे पालन होते की नाही, हेही तपासले पाहिजे, अशीही अपेक्षा या निवेदनात नमूद करण्यात आली आहे. 

भराभर इमारती उभ्या करण्याच्या नादात विकासक कोणतीही खबरदारी घेत नाहीत, असे गेल्या काही दिवसांत लागोपाठ घडणाऱ्या दुर्घटनांवरून दिसून येत आहे. मागाठाणे येथेही असेच घडले. अशा बेजबाबदार विकासकांवर कारवाई होणे आवश्यक आहे.
 - रोहन सावंत, मनसे विभाग अध्यक्ष. अंधेरी (पूर्व)

Web Title: Why did the precipice collapse in Andheri demanded an inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.