"त्यांना आत्ताच का सूचलं?"; गॅस सिलेंडर दरकपातीवर सुप्रिया सुळेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 11:49 AM2024-03-08T11:49:22+5:302024-03-08T11:51:56+5:30
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आज आम्ही एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत १०० रुपयांची सूट देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकांची घोषणा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तत्पूर्वी केंद्रातील मोदी सरकारकडून विविध विकासकामांचे भूमिपूजन केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या आठवडाभरात हजारो कोटींच्या प्रकल्पांचे आणि योजनांचा शुभारंभ देशातील विविध राज्यात केला आहे. त्यातच, महिला दिनाच्या निमित्ताने मोदी सरकारने सामान्यांना दिलासा दिला आहे. घरगुती एलपी सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून याची घोषणा केली. त्यानुसार, घरगुती सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यावरुन, आता विरोधकांचा प्रतिक्रिया येत आहेत. खा. सुप्रिया सुळे यांनी या निर्णयाचे स्वागत करत सरकारवर टीका केली.
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आज आम्ही एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत १०० रुपयांची सूट देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महिलांचं जीवन सोपं होण्यासोबतच कोट्यवधी कुटुंबावरील आर्थिक बोजाही कमी होणार आहे, असं नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सद्वारे म्हटलं. हे पाऊल पर्यावरणाच्या संरक्षणासाठीही मदतीचं ठरेल आणि कुटुंबाचं आरोग्यही उत्तम राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या निर्णयाचे देशभरातून स्वागत होत आहे. काही का होईना पण थोडासा आर्थिक दिलासा महिलांना मिळाल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय घेण्यात आल्याने विरोधकांकडून टीकाही केली जात आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं. मात्र, गेल्या ४ वर्षांत किंवा गेल्या ९ वर्षात देशात मोदी सरकार आहे. मग, यापूर्वीच हा निर्णय का घेतला नाही, आत्ताच सरकारने गॅस दरकपातीचा निर्णय का घेतला, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. तसेच, निवडणुका डोळ्यासमोर असल्याने हा निर्णय घेण्यात आला असून आमच्या काँग्रेस आघाडी सरकारच्या देशात सिलेंडर ५०० रुपयांत मिळत होता, असेही सुळे यांनी म्हटले.
#WATCH | On LPG cylinder prices reduced by Rs 100, NCP (SCP) MP Supriya Sule says, "I am not surprised at all. Look at the timing. They have been in power for the last 9 years. Why didn't they think of this earlier? Just when the election, I mean it will probably be announced in… pic.twitter.com/GUPDE29j1N
— ANI (@ANI) March 8, 2024
दरम्यान, मोदी सरकारने गतवर्षी महिला दिनादिवशीच देशातील महिलांना सिलेंडरच्या दरात सवलत देत, २०० रुपये कपात केली होती. त्यावेळी, ११०० रुपयांवरुन सिलेंडरचे दर ९०० रुपयांवर आले होते. आता, १०० रुपये आणखी कपात केल्यामुळे ९०० वरुन सिलेंडर ८०० रुपयांत मिळणार आहे. पुढील काही दिवसांतच लोकसभा निवडणुकांची घोषणा होत आहे. त्यानंतर, आचारसंहिता लागू होईल, त्यामुळे मोदी सरकारचा हा निर्णय सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारा निर्णय मानला जातो.