मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली लस इतर देशांना विकून आपल्या देशातील नागरिकांना लसीकरणापासून वंचित ठेवलेले आहे. याचा निषेध करण्यासाठी मुंबई काँग्रेसतर्फे ''मोदीजी हमारे बच्चों की व्हॅक्सिन क्यो बेची?'' आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी दिली.
मुंबईतील विविध ठिकाणी सकाळी १० ते ११ या वेळेत काँग्रेस कार्यकर्ते ''मोदीजी हमारे बच्चों की व्हॅक्सिन क्यो बेची?'' असे लिहिलेले फलक घेऊन उभे राहतील. दोन दिवसांत मोदी सरकार विरोधातील हे आंदोलन सुरू होईल आणि आठवडाभर चालेल, अशी माहिती भाई जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा उपस्थित होते. आमच्या देशातील १५० रुपयांची कोविडची लस जी आमच्या देशातील नागरिकांना मिळायला हवी होती, ती लस भाजप सरकारने इतर देशांना विकली व रशियातून आयात केलेली स्फुटनिकची १५०० रुपयांची लस आपल्या देशातील नागरिकांना विकू पाहात असल्याचा आरोपही जगताप यांनी केला.
तौक्ते वादळाने मुंबई व कोकण किनारपट्टीला मोठा तडाखा दिला आहे. महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक तसेच केरळ किनारपट्टीची प्रचंड हानी झाली आहे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील नुकसानग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर केले. आता महाराष्ट्राला दोन हजार कोटींचे पॅकेज केंद्राने द्यावे. तसेच राज्य सरकारने वादळामध्ये नुकसान झालेल्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, ज्या लोकांनी या वादळामध्ये जीव गमावला, त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची मागणी जगताप यांनी केली.