Join us

Rutuja Latke: ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्याबाबत भेदभाव का? उत्तर द्या!, मुंबई हायकोर्टाचे पालिकेला निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 1:52 PM

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्यापर्यंतची मुदत आहे. अवघा एक दिवस शिल्लक असतानाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार असलेल्या ऋतुजा लटके यांचा महापालिका कर्मचारी पदाचा राजीनामा स्विकारण्यात आलेला नाही.

मुंबई-

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्यापर्यंतची मुदत आहे. अवघा एक दिवस शिल्लक असतानाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार असलेल्या ऋतुजा लटके यांचा महापालिका कर्मचारी पदाचा राजीनामा स्विकारण्यात आलेला नाही. याच मुद्द्यावरुन ऋतुजा लटके यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. लटके यांच्या याचिकेवर आज सुनावणी सुरू असून हायकोर्टानं मुंबई महापालिकेला ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याबाबत आज दुपारी अडीच वाजेपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पालिकेकडून आता लटके यांच्या राजीनाम्यावर काय उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

भाजपाचा शिवसेना ठाकरे गटावर गंभीर आरोप; ऋतुजा लटकेंना उमेदवारी देण्यास विलंब का?

अंधेरी पूर्वचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. निवडणुकीत दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पण ऋतुजा लटके या महापालिकेच्या कर्मचारी असल्यानं त्यांना निवडणूक लढवण्याआधी पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. ऋतुजा यांनी २ सप्टेंबर रोजीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पण राजीनामा पत्रात तृटी असल्याचं त्यांना सांगण्यात आलं आणि लटेक यांनी ३ ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा नव्यानं राजीनामा दिला. पण त्या अर्जावर अद्याप कोणताही निर्णय पालिका अधिकाऱ्यांकडून घेण्यात आलेला नाही. काल ऋतुजा लटके यांनी महापालिका आयुक्तांचीही भेट घेतली होती. त्यांच्याकडूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं उद्धव ठाकरे गटानं थेट कोर्टात धाव घेतली. याच याचिकेवर आज सुनावणीला सुरुवात झाली आहे. 

शिंदे गटाला मिळतंय झुकतं माप, खरमरीत पत्र लिहून ठाकरे गटाचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

पालिकेच्या भूमिकेवर आज हायकोर्टानं थेट सवाल उपस्थित केला. पालिकेचा क वर्गातील एक कर्मचारी आहे आणि तो जर निवडणूक लढवू इच्छित असेल तर प्रथेप्रमाणे याआधीही तुम्ही राजीनामा घेतलेला आहे. पण याच बाबतीत तुम्ही भेदभाव का करत आहात?, असा सवाल हायकोर्टानं पालिकेला विचारला आहे. पालिकेनं दुपारी अडीच वाजता आपली भूमिका कोर्टासमोर स्पष्ट करावी. त्यांचा राजीनामा स्विकार करणार की नाही? हे सांगावं, असे निर्देश न्यायाधीशांनी दिले आहेत. 

पालिकेच्यावतीनं ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अनिल साखरे यांनी बाजू मांडली. त्यांनी ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लटके यांनी दिलेला राजीनामा योग्य पद्धतीचा नाही. एक महिन्याच्या बदल्यात रक्कम जमा केली असली तरी राजीनामा तातडीनं मंजुर केला जावा असा दावा करता येणार नाही, असं साखरे यांनी कोर्टासमोर म्हटलं. 

 

टॅग्स :शिवसेना