संतोष आंधळे, विशेष प्रतिनिधी
कोरोनानंतर सध्या संपूर्ण देशात गोवर साथीच्या आजाराची चर्चा सुरू आहे. केंद्र सरकानेही याची दखल घेतली आणि तज्ज्ञाची समितीचे पथक पाहणीसाठी मुंबईला पाठविले होते. त्यांनी सुद्धा गोवर आजाराचे हॉटस्पॉट ठरलेल्या गोवंडी परिसराला भेट दिली आणि तेथील मृत्युमुखी पडलेल्या बालकांच्या आई-वडिलांशी संवाद साधून माहिती घेतली होती. मार्चपासून गोवंडी परिसरात आतापर्यंत गोवरचे ६३ रुग्ण आढळले आहेत तर १,६०० संशयित रुग्ण आढळून आले आहे. विशेष म्हणजे मुंबईत गोवराच्या आजाराने मृत्यू झालेले ८ पैकी ७ बालक गोवंडी परिसरातील आहेत. या परिसरातीलच बालके का दगावतात, त्यांचे मृत्यू कसे थांबविता येतील हा आरोग्य व्यवस्थेला पडलेला प्रश्न आहे.
मुंबई महानगरपालिकेकडून बाळ निरोगी राहावे यासाठी शून्य ते पाच या वयोगटात बालकांना वयाच्या विविध टप्प्यांवर लसीकरण केले जाते. त्यामध्ये गोवर, रुबेला, गालगुंड, पोलिओ, हिपेटायटिस, टिटॅनस या व्यतिरिक्त पाच जीवघेण्या आजारापासून प्रतिबंधक लस दिली जाते. तसेच सहा महिन्यांनी अ जीवनसत्त्वाचा डोस, कृश बाळांना हिमोग्लोबीन, लोह यांसारखी औषधे पुरविली जातात. तसेच पोटात जंत होऊ नये म्हणून दरवर्षी एक मोहीम राबविली जाते. त्यात त्यांना औषधे दिली जातात. मात्र ही औषधे वेळेवर घेतली जात नसल्याचे चित्र आहे. लसीकरण करून न घेण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात दिसतो. विशेष सर्वेक्षणात गोवराचा एकही डोस घेतलेला नसल्याचे अनेक बालकांमध्ये आढळले आहे. गोवरग्रस्तांमध्ये काही मुले कुपोषित आढळली आहेत. तसेच एकाच कुटुंबात असणाऱ्या सदस्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्याकरिता राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने पुढे येऊन काम केले पाहिजे.
गोवंडीत लोक झोपडपट्टीत दाटीवाटीने राहत असल्याने त्यांना त्वचेचे विकार, क्षयरोग मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव आहे.
गरोदर महिलांसाठी दर गुरुवारी विशेष ओपीडी असते, तर दर महिन्याला ९ तारखेला स्त्रीरोगतज्ज्ञ हजेरी लावत असतात. कुटुंब नियोजनासाठी पात्र दाम्पत्यांना कुटुंब नियोजनाच्या शास्त्रक्रियेबद्दल माहिती दिली जाते तसेच येथून दरवर्षी २ टक्के लोकांचे स्थलांतर होते. ते मुंबईच्या दुसऱ्या भागात राहायला जातात.
लसीकरण करून न घेणे आणि कुपोषण या दोन मुख्य गोष्टी येथे अडसर आहेत. बालकाची रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर त्यांना कुठल्याही आजाराचा तत्काळ संसर्ग होतो. गोवर झालेल्या मुलाच्या थुंकीतून हा आजार १२ ते १४ मुलांमध्ये पसरू शकतो. त्यामुळे त्याला वेळीच पायबंद घालणे गरजेचे आहे. या परिसरात सर्वेक्षण करून तत्काळ सर्व मुलांचे लसीकरण पूर्ण करणे गरजेचे आहे. - डॉ. विजय येवले, सदस्य, राज्य, बाल कोरोना कृतिदल