मुंबई - आज शेतकऱ्यांसाठी सगळे पक्ष एकत्र येत आहेत पण मुळात कर्जमाफी मागायची वेळच शेतकऱ्यांवर का येते असा प्रश्न आदित्य ठाकरे उपस्थित केला. शेतकऱ्यांना कर्जमाफी नको तर कर्जमुक्ती हवी आहे असेही प्रतिपादन आज युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. ते विक्रोळीत शेतकरी मोर्च्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांशी बोलत होते.
माफीही गुन्हेगाराला दिली जाते. शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायला तो काही गुन्हेगार नाही त्याला काही द्यायचं असेल तर कर्जमुक्ती देणं गरजेचं आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, रंग कोणताही असला तरी आपण जमीनीवरचेच आहे. मी तुम्हाला वचन देतो प्रत्येक शिवसैनिक शेतकऱ्यांसाठी झटेल. तुमच्या वेदना कमी कऱण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असेल.
दरम्यान, 165 किमीचे अंतर कापून लाखोंच्या संख्येने मुंबईत धडकलेल्या शेतकरी मोर्चाचा फडणवीस सरकारने चांगलाच धसका घेतला आहे. उद्या सोमवारी विधानभवनावर हा मोर्चा धडकण्याआधीच सरकारने मध्यस्थी करत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असून त्यासाठी चर्चेसाठी येण्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या या लाँग मार्चला शिवसेना, मनसे, राष्ट्रवादीसह काँग्रेस पक्षानेही पाठींबा दिला आहे.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांच्या वतीने किसान मोर्चातील शेतकऱ्यांची विक्रोळीत भेट घेत स्वागत केलं. त्यानंतर शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा होईल, असं आश्वासन महाजनांनी मोर्चेकऱ्यांना दिलं. लेखी आश्वासनाशिवाय माघार घेणार नाही, मागण्या मान्य होईपर्यंत विधानभवनाला घेराव घालणार, असा निर्धार मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केला होता. त्यावर, लिखित आश्वासनाच्या मागणीवर चर्चा होईल आणि सकारात्मक चर्चा होऊन तोडगा निघेल, असा विश्वास महाजनांनी यावेळी व्यक्त केला.
विधान भवनाला घेराव - नाशिकमधून शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि हमीभावासह अन्य मागण्यांसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेला शेतक-यांचा मोर्चा आता मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. शनिवारी रात्री ठाण्यात मुक्काम केल्यानंतर 35 हजार शेतक-यांसह किसान मोर्चाने मुंबईत प्रवेश केला आहे. किसान मोर्चा आज मुंबईत मुक्काम ठोकेल तर सोमवारी सकाळी विधान भवनाला घेराव घालणार आहे.
मनसेचा पाठिंबा, राज ठाकरे घेणार भेट -काल डाव्या पक्षांच्या या मोर्चाला पाठिंबा देण्याचं शिवसेना आणि मनसेने जाहीर केल्यानंतर आज संध्याकाळी मनसे प्रमुख राज ठाकरे शेतकरी मोर्चाच्यामध्ये सामील झालेल्या शेतक-यांची भेट घेणार आहेत. संध्याकाळी 4.30 वाजेच्या सुमारास सोमैय्या मैदान, चुनाभट्टी-सायन येथे राज ठाकरे त्यांची भेट घेतील. हा महामोर्चा मुंबईत दाखल झाल्यावर मनसेकडून चेंबूर येथे मोर्चाचे स्वागत होणार आहे. स्वत: राज ठाकरे यांनी किसान सभेचे सचिव अजित नवले यांना फोन करुन, पाठिंबा जाहीर केला होता. मुंबईत आल्यानंतर या लाँग मार्चमध्ये मनसैनिकही सहभागी होतील, असं राज ठाकरे यांनी सांगितल्याचं अजित नवले म्हणाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस -
शेतकरी मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसचा मनापासून पाठिंबा असल्याचं पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केलं. सुनील तटकरे, धनंजय मुंडे हे शेतकऱ्यांच्या भूमिकेला समर्थन देण्यासाठी उभे राहतील. सामूहिक कार्यक्रम ठरल्यावर त्याच्या पाठीशी सातत्याने राहणार असल्याचं आश्वासन पवारांनी दिलं.
सरकारची भूमिका - शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार सकारात्मक असून उद्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा करणार आहे. त्यावेळी विविध खात्यांचे पदाधिकारी चर्चेत उपस्थित राहतील असं आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं आहे.