Join us

फडणवीस गृहमंत्री असतानाच अशा घटना का घडतात?; व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2024 7:13 PM

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासमोरच भाजपा आमदार सुनील कांबळे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यास मारहाण केली.

मुंबई/पुणे - भाजपा आमदार सुनिल कांबळे यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर विरोधकांनी भाजपाला लक्ष्य केलं. माध्यमांतील बातम्यांनंतर आमदार कांबळे यांनीही यावर स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असतानाच अशा घटना का घडतात, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने उपस्थित केला आहे. यावेळी, राज्यातील वेगवेगळ्या घटनांचा एकत्रित व्हिडिओ शेअर करत गृहमंत्री फडणवीसांना लक्ष्य करण्यात आलं आहे.

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासमोरच भाजपा आमदार सुनील कांबळे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यास मारहाण केली. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यास मारहण केल्याची घटना घडली. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आता विरोधकांनाही सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. पुणे येथील ससून रुग्णालयातील तृतीयपंथीय वार्डाचे उद्घाटन कार्यक्रमात हा प्रकार घडला. या कार्यक्रमास अजित पवार, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे यांच्यासह काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर उपस्थित होते. या घटनेवरुन राष्ट्रवादी शऱद पवार गटाने देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. 

महायुती सरकारचे मंत्री, नेते व आमदारांची सामान्य जनतेसह पोलिसांवर माजोरी; फडणवीस गृहमंत्री असतानाच का अशा घटना घडतात?, असे सवाल राष्ट्रवादीने विचारला आहे. राष्ट्रवादीने या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला आहे. ''ससून येथील कार्यक्रमात भाजप आमदाराने एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशीलात लगावल्याची घटना अत्यंत निंदनीय आहे. या महायुती सरकारचं चाललंय काय? अहिंसेच्या मार्गाने सुरु मराठा आरक्षण आंदोलनावर लाठीचार्ज काय होतो, वारकऱ्यांवर लाठीचार्ज होतो ते करण्याचे आदेश नेमके कोण देतं? एक मंत्री पोलिसांना जनतेला मारायला काय सांगतो, आमदार पोलिसांना मारतो काय, हे अतिशय गुंड प्रवृत्तीचे सरकार आहे'', असे म्हणत राष्ट्रवादीने विविध घटनांचा एकत्रित व्हिडिओ शेअर केला आहे. 

पोलीस हे जवाबदार शासकीय कर्मचारी असून तुम्ही त्यांचे मालक नाहीत. पोलिसांवर अन्याय होत असताना राज्याचे गृहमंत्री गप्प का? आपल्या पक्षाच्या आमदारावर कारवाई करण्याच्या सूचना ते आपल्या विभागाला देतील का? या ट्रिपल इंजिन खोके सरकारकडून सामान्य जनतेसह पोलिसांवर होत असलेली दादागिरी अजिबात खपवून घेतली जाणार नाही. राज्यातील जनता हे उघड्या डोळ्याने पाहत आहे, ही सत्तेची मस्ती जास्त काळ टिकत नसते, असेही राष्ट्रवादीने ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे.  

 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसराष्ट्रवादी काँग्रेसभाजपापोलिस