ज्यांना मोठे केले ते बेइमान का होतात? - बाळा नांदगावकर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 02:32 AM2020-01-24T02:32:19+5:302020-01-24T06:55:36+5:30
ज्याला ज्याला मोठे केले तो राज ठाकरेंवर टीका करून का जातो, हे तर अजूनही कळू शकलेले नाही
मुंबई : राज ठाकरे यांनी या १३ वर्षांत अनेकांना मोठे केले. मान, प्रतिष्ठा दिली. मात्र राज ज्यांना मोठे करतात ते बेइमान का होतात, असा प्रश्न करीत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पक्ष सोडणाऱ्यांवर नाव न घेता टीका केली. ज्याला ज्याला मोठे केले तो राज ठाकरेंवर टीका करून का जातो, हे तर मला अजूनही कळू शकलेले नाही, असेही ते म्हणाले.
गोरेगाव येथील मनसेच्या अधिवेशनादरम्यान बाळा नांदगावकर यांनी पक्षाची आजवरची वाटचाल, भूमिका आणि आगामी राजकारणाची मांडणी केली. मनसे सोडून जाणा-या नेत्यांवर टीकेची झोड उठवली. त्या वेळी जर आपल्या १३ आमदारांनी ग्रामीण भाग पिंजून काढला असता तर आज मनसेचे नवनिर्माण झाले असते, असे ते म्हणाले.
या वेळी नांदगावकर यांनी शिवसेनेवरही टीका केली. आज सत्तेसाठी कोण कुठे जातोय, कोणासोबत आहे, तेच कळत नाही. निवडणुकीत युती, निकालानंतर आघाडी असा प्रकार चालला आहे. आम्हाला अशी सत्ता नको आणि पदही नको. आमच्याकडे राजनिष्ठा हे पद आहे, तेवढेच पुरे, असे ते म्हणाले. कार्यकर्त्यांनी आता कामाला लागले पाहिजे. हा नवनिर्माणाचा झेंडा फडकवू या, असे आवाहन त्यांनी केले.
पहिल्याच अधिवेशनात ठराव
मनसेच्या या अधिवेशनात विविध ठराव संमत करण्यात आले. यात महाराष्ट्रात येणारे लोंढे थोपविण्यासाठी राज्याला विशेष दर्जा देऊन विशेष अधिकार दिलेच पाहिजेत.
स्थानिकांना ८० टक्के रोजगार, शाळेत मराठी भाषा सक्ती, मराठीला अभिजात भाषा दर्जा यासंबंधीचा पहिला ठराव संमत करण्यात आला. याशिवाय महिला अधिकार, सांस्कृतिक, शिक्षण हक्क, शहर नियोजन, शेती-सहकार, पाणी नियोजन आणि कामगार हिताबाबतचे ठराव मांडण्यात आले.