‘चित्रपटगृहातून खाद्यपदार्थ घेण्यास भाग का पाडता?’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 05:27 AM2018-01-05T05:27:53+5:302018-01-05T05:28:01+5:30
चित्रपटगृहे किंवा मल्टिप्लेक्समध्ये प्रवेश करताना सुरक्षारक्षक प्रेक्षकांची बॅग व पर्स तपासून त्यातील खाद्यपदार्थ बाहेर काढतात. असे करून प्रेक्षकांना चित्रपटगृह किंवा मल्टिप्लेक्समध्ये विकण्यात येणारे खाद्यपदार्थ विकत घेण्यास भाग का पाडता, असा प्रश्न करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला गुरुवारी यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिले.
मुंबई - चित्रपटगृहे किंवा मल्टिप्लेक्समध्ये प्रवेश करताना सुरक्षारक्षक प्रेक्षकांची बॅग व पर्स तपासून त्यातील खाद्यपदार्थ बाहेर काढतात. असे करून प्रेक्षकांना चित्रपटगृह किंवा मल्टिप्लेक्समध्ये विकण्यात येणारे खाद्यपदार्थ विकत घेण्यास भाग का पाडता, असा प्रश्न करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला गुरुवारी यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिले.
बाहेरील खाद्यपदार्थांना बंदी घालण्याच्या नियमाचा हेतू काय व हा नियम कायद्याला अनुसरून आहे का, याबाबत राज्य सरकारला तीन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश न्या. आर.एम. बोर्डे व न्या. राजेश केतकर यांनी दिले.
चित्रपटगृहांत खाद्यपदार्थ न बाळगण्याचा सरकारी नियम नसतानाही चित्रपटगृह मालकांनी व मल्टिप्लेक्सवाल्यांनी स्वत:चा नियम लावत प्रेक्षकांना बाहेरील खाद्यपदार्थ बाळगण्यास मनाई केली आहे.
त्यामुळे चित्रपटगृहांतील व मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थ विक्रेते प्रेक्षकांकडून दामदुप्पट किंमत आकारून प्रेक्षकांची लूटमार करतात. महाराष्ट्र चित्रपट (नियामक) नियमांनुसार, चित्रपटगृहे व आॅडिटोरियममध्ये खाद्यपदार्थांची विक्री करण्यास मनाई आहे. मात्र चित्रपटगृहे व मल्टिप्लेक्स या नियमांचे खुलेआम उल्लंघन करत असल्याचे मुंबईचे रहिवासी जैनेंद्र बक्सी यांनी जनहित याचिकेत म्हटले आहे.
थिएटरच्या बाहेर सुरक्षारक्षक असतात. ते प्रेक्षकांना खाद्यपदार्थ बाहेर काढून ठेवून त्यांना तेथील खाद्यपदार्थ विकत घेण्यास का भाग पाडले जाते, असा सवाल खंडपीठाने राज्य सरकारला केला.