पाडून बांधायचे सोडून डागडुजीवर का भागवता? STच्या धोकादायक इमारतींची गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 02:02 PM2023-08-23T14:02:40+5:302023-08-23T14:03:14+5:30
एसटीच्या धोकादायक इमारतीत काम करताहेत १२५ लोक
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अत्यंत धोकादायक अवस्थेत असलेल्या एसटी महामंडळाच्या विद्याविहार येथील जर्जर इमारतीची पुनर्बांधणी आवश्यक असतानाही महामंडळाने तिच्या डागडुजीचा घाट घातला असून, त्यासाठी १.६६ कोटींचा खर्च केला जाणार आहे. सुमारे १२५ अधिकारी, कर्मचारी काम करत असलेल्या या इमारतीत विभागीय नियंत्रकांचे कार्यालय असून, याशिवाय इतर तीन कार्यालये व एक गोदामही आहे. इमारतीची डागडुजी करण्याचा निर्णय झाला असला तरी त्याचा मुहूर्तही अद्याप ठरलेला नाही. या इमारतीला जागोजागी तडे गेले आहेत, खिडक्या तुटल्या आहेत, स्लॅबमधील लोखंडी बारला गंज लागला आहे. या इमारतीचे बांधकाम सन १९७२ मध्ये झालेले आहे. २०१७ मध्ये या इमारतीच्या दुरुस्तीसाठी मंजुरी देण्यात आली होती. मात्र, अद्यापही काम सुरू झालेले नाही.
ही कार्यालये असलेला भूखंड १० एकरांचा आहे. जुलै २०१७ मध्ये झालेल्या महामंडळ ठरावात विभागीय कार्यशाळा, भांडार, मुद्रणालय, विभागीय कार्यालय, रा. स. अधिकारी, कर्मचारी निवासस्थाने, व्यापारी संकुल यासाठी ४०० कोटींच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली होती. या प्रकल्पासाठी वास्तुविशारद म्हणून मे. गोडबोले मुकादम, आर्किटेक्ट यांची नियुक्ती करण्यात आली होती व पुढील कार्यवाही त्यांच्या मार्फत करण्यास संचालक मंडळाने मान्यता दिली होती. संचालक मंडळाची मान्यता मिळाल्यानंतर जुलै २०१८ मध्ये या प्रकल्पासाठी विकासकाची निवड करण्यासाठी ई-निविदा मागविण्यात आल्या. यामध्ये में. एडूस पार्क इंटरनॅशनल प्रा.लि. या विकासकाची निवड केली होती. विकासकाच्या निवडीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता; पण मंजूर झाला नाही.
या इमारतीतील कार्यालये
- मुंबई पुणे प्रादेशिक कार्यालय
- मुंबई विभागीय कार्यालय
- विभागीय कार्यशाळा
- एसटी कर्मचारी बँक शाखा
- विभागीय भांडार
एसटीच्या विद्याविहार येथील विभागीय कार्यालय असलेल्या इमारतीची अवस्था जास्त खराब असल्याने दुरुस्ती केली जात आहे. या इमारतीचा पुनर्विकास केला जाणार आहे. परंतु, तो पर्यंत इमारत टिकावी म्हणून दुरुस्ती केली जात आहे. या इमारत पुनर्विकासाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता; पण मंजूर झाला नाही.
- शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ
एसटीच्या बांधकाम विभागाच्या दुरुस्ती कामाचा इतिहास पाहता दुरुस्तीचे काम जास्त दिवस टिकत नाही. त्यामुळे विभागीय कार्यालय या इमारतीचा पुनर्विकास करणे गरजचे आहे. अन्यथा दुर्घटना घडू शकते.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस