अतुल कुलकर्णी, संपादक, लोकमत
एक मालिका मराठी चॅनलवर येत होती. त्यात नवऱ्याची भूमिका करणारा कलाकार अभिनेत्रीला कमरेच्या बेल्टने मारतो, असे दाखवले जायचे. त्यावरून महिला संघटना आक्रमक झाल्या. दबाव वाढल्यानंतर चॅनेलने बेल्टने मारणे बंद केले. त्या मालिकेचा टीआरपी लगेच घसरला. पुन्हा चॅनलने मारझोड सुरू केली, पुन्हा टीआरपी वाढला. हे एक उदाहरण समाजात काय चालू आहे यासाठी पुरेसे आहे. पूर्वी मुलांवर संस्कार होण्यासाठी बाल शिवाजींच्या साहस कथा सांगितल्या जायच्या. काऊ-चिऊच्या गोष्टीसोबत आजी-आजोबा मुलांना अनेक गोष्टी शिकवायचे. आता ते वृद्धाश्रमांत गेले. न्यूक्लियर कुटुंब पद्धतीत नवरा, बायको, मुलगा, मुलगी अशा चौकोनी कुटुंबाचा स्वतंत्र राहण्याकडे कल वाढला. आता मुलांची जबाबदारीही कोणाला नको आहे. त्यामुळे ‘लिव्ह इन रिलेशन’ या गोंडस नावाखाली लोक एकत्र राहू लागले आहेत. बदल हा कायमस्वरूपी असतो. असे असले तरी, या बदलाच्या वावटळीने आजी-आजोबांच्या संस्कारक्षम गोष्टी कधीच मागे सोडून दिल्या आहेत.
कॉलेजमध्ये मुलगा-मुलगी एकत्र यायचे. त्यांच्यात कधी वादही होत असे. वाद झाल्यानंतर दोघे एकमेकांकडे पाठ फिरवून निघून जात. काही वेळाने मुलाला किंवा मुलीला आपली चूक लक्षात यायची. दोघांपैकी एक जण तिच्या किंवा त्याच्या घरचा फोन नंबर मिळवायचा. फोनवर दोघे एकमेकांना सॉरी म्हणायचे आणि पुन्हा त्यांच्या भेटीगाठी सुरू व्हायच्या. यामध्ये काही वेळ जात असे. त्यामुळे दोघांनाही नेमके काय घडले हे समजून घ्यायला पुरेसा वेळ मिळायचा. आता तसे होत नाही. भांडण झाल्यानंतर दुसऱ्या क्षणाला लिफ्टमधून उतरताना तो किंवा ती एकमेकांना व्हॉट्सॲपवर शिव्यांची लाखोली वाहत आपले संबंध संपले, असे सांगून मोकळे होतात. सोशल मीडियातील एकमेकांचे फोटो खटाखट डिलीट करून टाकतात. आमचा ब्रेकअप झाला हे सांगायला त्यांना काही सेकंद पुरेसे असतात. या वेगाने माणसाची विचार करण्याची क्षमता संपून टाकली आहे. संवाद संपून गेला. नात्यांमध्ये व्यवहार आला. प्रत्येक गोष्टीत आपल्याला काय मिळणार, याचा विचार होऊ लागला. ज्या वेगाने आजूबाजूचा समाज बदलत आहे, ज्या गतीने समाजात घडणाऱ्या वाईट घटना काही क्षणात आपल्यापर्यंत पोहोचत आहेत, त्याने माणसाची विचारशक्तीच भ्रष्ट करून टाकली आहे.
काही वर्षांपूर्वी प्रत्येक शहराची स्वतंत्र ओळख होती. काही शहरे व्याख्यानमालेसाठी, काही नाटकाच्या प्रेक्षकांसाठी, काही पुस्तकाच्या वाचनाची आवड आहे यासाठी ओळखली जात. आता सगळ्या शहरांचा चेहरा एकच झाला आहे. सांस्कृतिक कार्यक्रम संपत चालले. मसाला नाटकांची आवड वाढीला लागली. प्रयोगशील विषय नकोसे झाले. वेगवेगळ्या विषयावर विनाकारण गप्पा मारण्याची सवय संपून गेली. प्रत्येक गोष्टीत स्वार्थ आणि माझे काय या दोन प्रश्नांनी जखडून टाकले आहे. एखादे जंगल खूप चांगले आहे. त्या ठिकाणी वाघ, सिंह यांची संख्या उत्तम आहे, याचा अर्थ त्या जंगलाची अन्नसाखळी उत्तम आहे, असा होतो. छोट्या कीटकापासून ते वाघ, सिंहापर्यंत त्या जंगलात प्रत्येकाला काही ना काहीतरी खायला आहे. जंगलाची अन्नसाखळी चांगली म्हणून तिथे सर्व प्रकारचे पक्षी, प्राणी पाहायला मिळतील. माणसाचे यापेक्षा वेगळे काय असते..? माणूस समूहात राहणारा प्राणी आहे.
बुद्धीच्या जोरावर आपण जग पादाक्रांत करण्याच्या गोष्टी करू लागलो. मात्र, त्या समाजासाठी लागणाऱ्या ज्या-ज्या म्हणून चांगल्या गोष्टी आहेत, त्या एकेक करून आपण सोडून देऊ लागलो. भजन, कीर्तन, व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रम, सुसज्ज वाचनालय, लेखन, वाचन यासोबतच राजकारण आणि अगदी वेश्यालयदेखील त्या त्या शहराची भूक भागवण्यासाठी असतात. या सगळ्या गोष्टी ज्या शहरांमध्ये व्यवस्थित असतात, त्या शहराची समाज साखळी उत्तम आहे, असे निष्कर्ष काढले जातात. दुर्दैवाने आपण ही साखळीच मोडीत काढली आहे. परिणामी, लोकांच्या बुद्धीला चालना देणाऱ्या गोष्टीच आजूबाजूला घडत नसतील, माणसं एकलकोंडी होत असतील, स्वमग्न, आत्मकेंद्रित होत असतील तर त्या समाजात किंवा अशा शहरांमध्ये टोकाच्या निर्दय गोष्टी घडायला वेळ लागत नाही. या अशा वातावरणात सोशल मीडियाने निभावलेली भूमिका भयंकर आहे.
घडलेल्या घटनेतले क्रौर्य किती आहे, यामुळे आम्ही अस्वस्थ होत नाही. मात्र, मारणारा किंवा मेलेला कुठल्या जाती-धर्माचा आहे त्यावरून आमच्या अभिनिवेशाचे चढ-उतार सोशल मीडियातून उमटत राहतात. हिंसेला जात, धर्म नसतो. हे आम्ही विसरून चाललो आहोत. सोशल मीडियाच्या अतिरेकाने लोकांची विचार करण्याची क्षमता आणि ‘स्पेस’ संपवून टाकली. मोबाइल येण्याआधी आपल्याला कितीतरी फोन नंबर पाठ असायचे. आपल्या मेंदूत नंबर पाठ ठेवणारा सेल ॲक्टिव्ह होता. कारण आपण त्याचा वापर करत होतो. मोबाइल आले आणि आपल्याला आपल्या कुटुंबातील सदस्यांचे नंबरही पाठ करून ठेवायची गरज वाटेनाशी झाली. परिणामी, हळूहळू मेंदूतला तो ‘सेल’ डेड झाला. कुठल्याही समाजाचे असेच होते. आम्ही समाज म्हणून, आजूबाजूचा परिसर म्हणून, कसे वागतो, कसे राहतो आणि बोलतो, यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात.
एखाद्याने बायकोचे तुकडे केले किंवा तिचे डोके भिंतीवर आपटून मारले, अशा बातम्या आल्या की तेवढ्यापुरते तेवढे आपण चर्चा करतो. घडणाऱ्या घटनांचा वेगच इतका भयंकर आहे की क्षणाक्षणाला दुसऱ्या घटना समोर येतात आणि आपल्याला अशा घटनांचे काहीही वाटत नाही. त्यामुळेच लव्ह, सेक्स इतक्या मर्यादित गोष्टीत लोक अडकून पडतात. त्यात कोणी धोका दिला की संताप करतात. संतापाच्या भरात वाटेल ते टोक गाठायला आपण मागेपुढे पाहत नाहीत. यातून बाहेर कसे पडायचे याचे उत्तर आपल्यातच आहे. फार कुठे जाऊन शोधण्याची गरज नाही...