मुंबईत लाइट का जाते?

By सचिन लुंगसे | Published: June 5, 2023 01:35 PM2023-06-05T13:35:45+5:302023-06-05T13:36:29+5:30

भारनियमनाचा जाच नसलेल्या मुंबईला कोरोनाकाळापासून मोठ्या प्रमाणावर खंडित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागला आहे.

why does the light go off in mumbai | मुंबईत लाइट का जाते?

मुंबईत लाइट का जाते?

googlenewsNext

- सचिन लुंगसे

भारनियमनाचा जाच नसलेल्या मुंबईला कोरोनाकाळापासून मोठ्या प्रमाणावर खंडित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागला आहे. विशेषत: कोरोनाच्या सुरुवातीलाच निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे संपूर्ण मुंबई अंधारात गेली होती. त्यानंतर अशा घटना दोन वेळा घडल्या आणि आता तर सातत्याने मागणीनुसार विजेचा पुरवठा करताना वीज कंपन्यांना तारेवरची कसरत करावी लागत असून, मुंबईच्या पारेषण वाहिन्यांची क्षमताही संपली आहे. परिणामी, भविष्यात मागणीनुसार विजेचा पुरवठा करताना अतिरिक्त वीज वाहून आणण्यासाठी २ हजार मेगावॉट क्षमतेच्या पारेषण वाहिन्यांचे जाळे उभे केले जात आहे.

आर्थिक राजधानी मुंबईत सेकंदासाठी वीजपुरवठा खंडित झाला तरी कोट्यवधीचे नुकसान होते. म्हणूनच बेस्ट, अदानी, टाटा आणि महावितरणसारख्या वीज कंपन्या मुंबईत अधिक खबरदारी घेतात. मात्र तरीही मुंबापुरीची विजेची मागणी वाढल्यानंतर चारही वीज कंपन्यांची भंबेरी उडते. गेल्या आठवड्यात आरेमधील अदानीच्या २२० केव्हीच्या वीजवाहिनीमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि पश्चिम उपनगरांत वीजपुरवठा काही काळासाठी ठप्प झाला. कोरोना काळात तर महापारेषणच्या वाहिन्यांमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश काळोखात गेला होता. अशा घटना तीनदा घडल्या. तेव्हापासून मुंबईसाठीच्या पारेषण वाहिन्यांची क्षमता वाढविण्याचा मुद्दा चर्चिला जात असून, हे प्रत्यक्षात उतरण्यास दोन ते दीड वर्षांहून अधिक काळ लागणार आहे. तोवर तांत्रिक बिघाडामुळे मुंबईकरांवर लाइट जाण्याची टांगती तलवार कायमच असणार आहे. 

वीजपुरवठा खंडित होण्यास केवळ वीज कंपन्या कारणीभूत असतात असे नाही. वीज कंपन्या एखाद्या परिसराला, एखाद्या घराला वीज उपकरणांसाठी लागणाऱ्या क्षमतेनिहाय युनिटनुसार विजेचा पुरवठा करतात. संबंधित घरात तद्नंतर एसी, पंखा, वॉशिंग मशीन... असे अधिकचे वीज वापरणारे उपकरण वाढले तर संंबंधिताने आपल्या वीज कंपनीला याची माहिती देणे गरजेचे असते. कारण अशा उपकरणांमुळे विजेची मागणी वाढल्याने विजेच्या पुरवठ्यादरम्यान यंत्रणेवर लोड असल्याने तांत्रिक बिघाड होण्याची शक्यता असते. मात्र आता सक्षम होत वीज कंपन्यांनी आपल्या उपकेंद्राची क्षमता वाढविण्यावर भर दिल्याने सहसा अडचणी येत नाहीत.

मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या चार ४०० केव्ही वीजवाहिन्या आहेत. या चारही वाहिन्या ४०० केव्ही कळवा उपकेंद्र येथे येतात. तेथून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राला वीज वितरित केली जाते. तसेच टाटा आणि अदानी यांचे एकत्रित १८०० मेगावॉट वीजनिर्मितीद्वारे वीजपुरवठा केला जातो.

मुंबई महानगर प्रदेशातील अपेक्षित भारवाढीचा विचार करता आणि भारवाढीच्या तुलनेत लोड एन्ड जनरेशन कमी होत असल्याचे लक्षात घेत दोन ट्रान्समिशन प्रकल्प राबविले जात आहेत. पहिला प्रकल्प खारघर-विक्रोळी ४००/२२० केव्ही ईएचव्ही ट्रान्समिशन लाइन प्रकल्प आहे. यामुळे अतिरिक्त १ हजार मेगावॉट वीजपुरवठा होईल. दुसरा प्रकल्प म्हणजे ४०० केव्ही कुडस आणि अदानीच्या २२० केव्ही आरे ईएचव्ही सबस्टेशन दरम्यानचा ८० किलोमीटरचा प्रकल्प होय. अंडरग्राउंड हाय व्होल्टेज डीसी कॅबलेड सिस्टीमचा हा प्रकार मुंबईच्या लोड सेंटरमध्ये असलेल्या अतिरिक्त १ हजार मेगावॉट विजेसाठी वेगळा कॉरिडोर स्थापित होईल.

 

Web Title: why does the light go off in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.