Join us

"तू त्यांची नावं घेऊन का नाही बोलत?"; भुजबळांचा जरांगे पाटलांवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 2:33 PM

जरांगे पाटील सध्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात दौरा करत असून गाव खेड्यात जाऊन मराठा समाजाला एकत्र आणत आहेत.

मुंबई - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनास बसलेले उपोषणकर्ते मनोर जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. आपल्या दौऱ्याच्या पहिल्याचदिवशी यांनी ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार प्रहार केला. तसेच, ओबीसी समाजामध्ये संभ्रम पसरवला जात आहे, त्यांना आमची भूमिका नीटपणे समजावून सांगण्याची गरज असल्याचंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय. मात्र, यावेळी, छगन भुजबळ यांचा एकेरी उल्लेख करत त्यांनी टीका केली होती. त्यावर, आता छगन भुजबळ यांनीही पलटवार केला आहे.  

जरांगे पाटील सध्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात दौरा करत असून गाव खेड्यात जाऊन मराठा समाजाला एकत्र आणत आहेत. याचदरम्यान, त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली. आपला ओबीसी समाज ६० टक्के आहे. अजिबात त्या छगन भुजबळला ताकद देऊ नका... त्याला एकट्यालाच खायचंय सगळं... अशा शब्दात त्यांनी भुजबळांना लक्ष्य केलं. त्यावर, आता भुजबळांनीही जरांगे पाटलांवर एकेरी भाषेतच पलटवार केला आहे. 

मराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण देणार नाही किंवा देता कामा नये, अशी भूमिका सर्वांचीच आहे. मला एकट्यालाच का बोलताय, माझ्या एकट्याच्या हातात काय आहे?. ही सगळी मंडळी जी आहे, ती त्याच मताची आहे, हेच मला त्या जरांगेंना सांगायचंय. मग, तू त्यांची नावं घेऊन का नाही बोलत, असा पलटवार राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केला आहे. 

काय म्हणाले जरांगे पाटील

'गेल्या ७५ वर्षांपासून मराठा समजाने ओबीसी नेत्यांची प्रतिष्ठा, मान, इज्जत वाढवली. आम्ही मराठ्यांनी तुमच्यावर उपकार केले. आमच्या बापजाद्यांनी तुमची प्रतिष्ठा वाढवली. आता उपकाराची परतफेड करण्याची वेळ आली. आरक्षण द्या आणि उपकाराची परतफेड करा. आमचा बदला घेऊ नका,' असे म्हणत मनोज जरांगे पाटलांनी मंत्री छगन भुजबळांना सुनावले.

५००० पुरावे आढळले आहेत - पाटील

आतापर्यंत ज्यांनी आरक्षणाचे लाभ घेतले त्यांच्याकडून कसलेही पुरावे घेतले नाही. एका गावात एकाचा जरी पुरावा आढळून आला, तर संपूर्ण गावाला ओबीसी प्रमाणप्तर द्यावेच लागतील. सरकारमधील प्रतिनिधींनी सांगितलं होतं की, आरक्षण मिळवण्यासाठी काही निकष आहेत, काही आधार लागतो, पुरावा मांडावा लागतो. आता पाच हजार पुरावे आढळून आले आहेत. आता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. 

 

टॅग्स :छगन भुजबळमराठा आरक्षणअन्य मागासवर्गीय जातीओबीसी आरक्षण