कुटुंबासह स्वत:च्या वाहनांनी जाणाऱ्यांना ई-पासचे विघ्न कशाला?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 04:11 AM2020-08-21T04:11:43+5:302020-08-21T04:11:50+5:30
आमच्याकडे वाहन आहे हा आमचा गुन्हा आहे का? आमच्याच मागे ई-पासचे विघ्न कशाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
मुंबई : परिवहन विभागाने सुरू केलेल्या आंतरजिल्हा बससेवेमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला. त्यात ई-पासचह कटकटही नाही. मात्र दुसरीकडे ज्यांच्याकडे स्वत:चे वाहन आहे, त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर आहे. आमच्याकडे वाहन आहे हा आमचा गुन्हा आहे का? आमच्याच मागे ई-पासचे विघ्न कशाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
मुलुंडचे अनिल सॅम्युअल यांच्या म्हणण्यानुसार, शासनाने सर्वांसाठी समान नियम करणे गरजेचे आहे. स्वत:च्या वाहनाने कुटुंबासह जाताना आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास बंधनकारक करण्याचे कारण काय? उलट कुटुंब म्हटल्यावर जास्त काळजी घेऊनच प्रवास करणार आहोत. ई-पास बंद करणे गरजेचे आहे. किरण जाधव म्हणाले, गणेशोत्सवासाठी गावी जाण्यासाठी अखेरच्या टप्प्यात पर्याय उपलब्ध झाला. उशिरा गेल्याने तेथे पोहोचल्यानंतर क्वारंटाइनचे संकट होतेच. पर्यायी जाणेच रद्द केले.
एका पोलीस अधिकाºयाने सांगितले, ई-पास बंद केल्यास विनाकारण भटकणारे वाढल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
>सरकारी बसच्या प्रवासात ई-पास का नको?
दादरच्या रेश्मा देशमुख यांच्या म्हणण्यानुसार, प्रशासनाने सर्वांसाठी समान नियम ठेवणे गरजेचे आहे. भांडुपचे निशांत पेडणेकर यांनीही प्रशासनाने ई-पासचा घाट बंद करणे गरजेचे असल्याचे मत मांडले. काही नागरिकांच्या मते सर्वांनाच ई-पास बंधनकारक करायला हवा. सरकारी बसमधून प्रवास करणाऱ्यांना ई-पास का नको? जे बसमधून जाणार त्यांना बाधा होणार नाही, हे कसे ठरवणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.