विशेष गाड्यांसाठी दीडपट जास्त भाडे कशासाठी ? अंतर सारखे असल्याने रेल्वे प्रवाशांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 02:06 AM2020-11-02T02:06:47+5:302020-11-02T06:56:05+5:30
special trains : मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष मधू कोटीयन म्हणाले, थांबे समान आणि अंतर समान असेल तर जास्त भाडे आकाराने चुकीचे आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाकडे तक्रारही केली आहे.
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे वाहतूक बंद आहे. परंतु विशेष लोकल आणि मेल, एक्स्प्रेस गाड्या चालविण्यात येत आहेत. मेल, एक्स्प्रेस गाडीचे अंतर समान, थांबा समान असूनही दीडपट जास्त भाड्याचा भुर्दंड का, असा सवाल रेल्वे प्रवाशांनी केला आहे.
रेल्वे प्रवासी प्रसाद पाठक म्हणाले की, मध्य रेल्वे सध्या ठराविक मेल, एक्स्प्रेस गाड्या या स्पेशल म्हणून चालवत आहे. कोयना विशेष गाडी आहे ती मूळ कोयना गाडी ज्या वेगाने ज्या थांब्यावर थांबत होती ते सर्व थांबे समान आहेत. मग दीडपट जास्त तिकीट दर का, नेहमीच्या दरानुसार गाड्या सोडल्या तरी फिजिकल डिस्टन्स पाळले जाऊ शकते. मग ही लूट का केली जात आहे, असा सवाल अनेक प्रवाशांनी केला.
मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष मधू कोटीयन म्हणाले, थांबे समान आणि अंतर समान असेल तर जास्त भाडे आकाराने चुकीचे आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाकडे तक्रारही केली आहे.
सण, उत्सवामुळे विशेष दर
कोरोनाच्या काळ आहे म्हणून नाही तर सण, उत्सवात जेव्हा विशेष गाड्या चालवल्या जातात. तेव्हा तिकीट दर जास्त आकारले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून असे केले जाते. कोरोना असल्याने जास्त भाडे आकारले जाते, असे काही नसल्याचे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.