लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे हनुमान चालीसा सोडून पेट्रोल - डिझेलवर बोलतायत, हेही नसे थोडके, असा टोला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.
राज्य सरकारने पेट्रोल- डिझेलवरील व्हॅटबाबत केलेल्या घोषणेवर फडणवीस यांनी टीका केली होती. यासंदर्भात बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत. उशिरा का होईना, पेट्रोल, डिझेल, गरिबांचे रोजगार याबद्दल त्यांना जाणीव होते आहे. दरम्यान, अयोध्या दौऱ्यासाठी सापळा रचला जात असल्याच्या राज ठाकरे यांच्या विधानाचाही आव्हाड यांनी समाचार घेतला. सापळा कुणी लावला, कुणासाठी लावला, यामध्ये आम्ही पडत नाही. सापळा लागला होता की नाही, हे त्यांनी बघावे. यांच्या आणि त्यांच्या नात्यातील तो सापळा होता, असेही आव्हाड म्हणाले.
ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा होईलओबीसी आरक्षणावरून राज्य सरकारवर होत असलेल्या टीकेबद्दल बोलताना आव्हाड म्हणाले की, ओबीसी आरक्षण हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या तत्त्वांवर आधारित आहे. सर्वोच्च न्यायालयात हा विषय आहे. त्यावरून होणारे राजकारण प्रगल्भता नसल्याचे दाखवते. ज्या पद्धतीने बांठिया आयोग काम करतोय, डाटा गोळा करतोय त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शंभर टक्के महाराष्ट्राच्या बाजूने लागेल. ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वासही जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.