त्यावेळी बाळासाहेबांवर खटला का दाखल केला?, उद्धव ठाकरेंचा पवारांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 09:23 PM2019-10-08T21:23:44+5:302019-10-08T21:36:34+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना दसरा मेळाव्यात शरद पवार आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मुंबईः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना दसरा मेळाव्यात शरद पवार आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अजित पवारांचा हवाला देत त्यांनी शरद पवारांवरही टीकास्त्र सोडलं आहे. शरद पवारांना उद्देशून ते म्हणाले, 2000साली जे तुम्ही करत होतात, त्यावेळी का महाराष्ट्र धगधगता ठेवला होतात. शिवसेनाप्रमुखांना अटक झाली, लोकांची धावपळ झाली. 1992-93ला बाबरी कुठे पाडली, पण शिवसेनाप्रमुखांना इथे अटक करण्यात आली. त्यावेळी शरद पवारांच्या हाती सत्ता होती, तरीही बाळासाहेबांवर खटला का दाखल केला?, असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि पवारांना विचारला आहे.
शरद पवारांना ईडी घाबरली अशी चर्चा झाली. शरद पवार, अजित पवार यांच्याबाबत सुडाने राजकारण चालू आहे, असे आरोप केले जात आहेत. त्यात खरे असू शकेल. पण सुडाचे राजकारण करणाऱ्यांना महाराष्ट्र कधी माफ करीत नाही. 15 दिवस जनतेला छळले. शिवसेनाप्रमुख आज अटक होणार, उद्या अटक होणार अशा अफवा पसरायच्या. शाळा – कॉलेज सोडावी लागायची. त्यावेळी बाबरी मशीद पडली अयोध्येत, पण दंगल घडली मुंबईत. बॉम्बस्फोट झाले मुंबईत. त्यावेळी सुधाकर नाईक – शरद पवार यांचेच सरकार होते. त्यावेळी शिवसेनेनेच हिंदूंना वाचवले. सरकारने ‘सामना’चा जुना अग्रलेख शोधून काढला आणि शिवसेनाप्रमुखांवर गुन्हा दाखल केला.
शिवसेनाप्रमुख स्वतः कोर्टात हजर झाले आणि कोर्टाने सांगितले की ही केसच होऊ शकत नाही, तेव्हा तुम्ही गप्प का होतात. सुडाचे राजकारण जर कोणी करायला गेले तर त्याला तोडून मोडून ठेवल्याशिवाय राहणार नाही. देशद्रोहाचा खटला काढून टाकणाऱ्या काँग्रेसला पाठिंबा द्यायचा का ?, जोपर्यंत आम्ही त्यांचे टार्गेट आहोत, तोपर्यंत आमचेदेखील टार्गेट तेच राहणार आहे. आमच्या विजयाचे पेढे खाण्यासाठी आता थकू नका ताजेतवाने राहा, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीला लगावला आहे. मागील सर्व अनुभव पाहून मी का बरे भाजपा सोबत युती करायची नाही ?, राम मंदिर पूर्ण करण्याचे काम शिवसेना करणार आहे.
शिवसेनाप्रमुखांचे विचार आज पूर्ण जगाला पटायला लागले आहेत. ट्रम्प यांना शिवसेनाप्रमुखांचा पवित्रा कळला की भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. मराठी माणूस आणि मराठी तरुणाला चालायला शिवसेनेने शिकवला. थोतांड करणाऱ्यांच्या विरोधात शिवसेना उभी राहणार आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत कर्जमाफी हा शब्द मला पटत नाही, कर्जमुक्ती झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार आहोत. 10 रुपयांमध्ये सकस आहाराची थाळी आपण देणार आहोत. 300 युनिटपर्यंतचा विजेचा दर शिवसेना कमी केल्याशिवाय राहणार नाही. सदृढ महाराष्ट्र करण्यासाठी एक रुपयांमध्ये आरोग्य चाचणी केंद्र उभे करणार आहे. महिला भगिनींच्या सुरक्षिततेसाठी बस सेवा सुद्धा शिवसेना देणार असल्याचं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.