सवलतीच्या कला गुणांवर फुली कशासाठी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:06 AM2021-06-01T04:06:13+5:302021-06-01T04:06:13+5:30
एलिमेंटरी, इंटरमिजिएट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा सवाल सीमा महांगडे मुंबई : विद्यार्थ्यांना त्यांच्या मागील इयत्तांमधील क्रीडा कामगिरीवरून यंदाच्या दहावी, बारावीच्या ...
एलिमेंटरी, इंटरमिजिएट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा सवाल
सीमा महांगडे
मुंबई : विद्यार्थ्यांना त्यांच्या मागील इयत्तांमधील क्रीडा कामगिरीवरून यंदाच्या दहावी, बारावीच्या परीक्षांत क्रीडा सवलतीचे गुण देण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केला आहे, मग ज्यांनी रेखाकला परीक्षा देऊन आपले कला गुणांचे प्रस्ताव मंडळाकडे पाठविले त्यांना सवलतीचे कला गुण का नाहीत, असा प्रश्न विद्यार्थी, पालक आणि कला शिक्षकांनी उपस्थित केला.
मागील २ वर्षांत रेखाकला परीक्षा झाल्या नसल्या तरी ज्या विद्यार्थ्यांनी आधीच्या वर्गांमध्ये त्याचे गुण मिळविले आहेत, त्यांच्या कला गुणांबाबत दुजाभाव का, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी केला. यंदाचे दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर लागेल. अंतर्गत मूल्यांकनामध्ये श्रेणी विषयांच्या गुणांचा समावेश करण्यात येणार असून, क्रीडाच्या गुणांनाही परवानगी देण्यात आली आहे. मग कलागुणांवर गंडांतर का, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दहावीच्या परीक्षेत शासकीय रेखाकला परीक्षेचे सवलतीचे अतिरिक्त गुण देण्यात येऊ नयेत, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने यापूर्वीच जारी केला आहे. सवलतीच्या क्रीडा गुणांना परवानगी देताना विद्यार्थ्याची आठवी तसेच नववीतील क्रीडा कामगिरी लक्षात घेण्याचे निर्देश दिले आहेत. असे असताना ज्यांनी दोन्ही एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा दिल्या आहेत, त्यांच्यावर अन्याय हाेईल, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
या निर्णयामुळे यंदा ८ ते १० हजार विद्यार्थ्यांच्या सवलतीच्या गुणांवर गंडांतर आले आहे. कला विषयाला आणि त्यातून मिळणाऱ्या गुणांना अशाप्रकारे राज्यात डावलले जात असेल, तर ही मोठी शोकांतिका असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे सदस्य व ठाणे जिल्हाध्यक्ष सुभाष अंबोरे यांनी दिली. यासंदर्भात वेळोवेळी शिक्षणमंत्री आणि मंडळाला निवेदने दिली. मात्र, त्यावर निर्णय न झाल्याची माहिती त्यांनी दिली.
* सवलतीचे गुण वगळणे चुकीचे
अंतर्गत मूल्यमापनाचा निर्णय झालेला नसताना कला गुण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, आता आमच्या गुणांची टक्केवारी अंतर्गत गुणांवर अवलंबून असताना सवलतीचे गुण त्यातून वगळणे हे चुकीचे ठरणार आहे. कला गुण अंतर्गत गुणांमध्ये समाविष्ट करण्यास मान्यता द्यावी.
- श्रेयसी काळे,
विद्यार्थिनी, दहावी
* विचार व्हायला हवा
क्रीडाच्या सवलतीच्या गुणांचा निर्णय अद्याप झाला नव्हता. मात्र, अंतर्गत गुणांच्या निर्णयामुळे तो घेण्यात आला. आता ज्यांनी चित्रकलेच्या दोन्ही परीक्षा दिल्या आहेत, त्यांच्या हक्काच्या सवलतीच्या गुणांचा विचारही अंतर्गत गुणांमध्ये व्हायलाच हवा.
- संदीप राजभोर, शिक्षक
* कसे मिळतात सवलतीचे कला गुण
दहावी विद्यार्थ्यांना इंटरमिजिएट ड्रॉइंग परीक्षेत ए ग्रेड मिळाल्यास ७ गुण प्राप्त होतात. या विद्यार्थ्यांना इंटरमिजिएट ड्रॉइंग परीक्षेत बी ग्रेड मिळाल्यास ५, सी ग्रेड मिळाल्यास ३ गुण मिळतात. विद्यार्थी एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण असल्याशिवाय त्याला इंटरमिजिएट परीक्षेचे गुण मिळत नाहीत.
....................................