मुंबई – ज्यांच्यामुळे कोरेगाव-भीमा प्रकरण घडले त्यांना सरकार अटक करत नाही. सरकार त्या दोन व्यक्तींसमोर हतबल झाले आहे ? हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले. त्यामुळे कोरेगाव-भीमाच्या घटनेला सरकारची स्पॉन्सरशिप होती का ? असा संतप्त सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज या विषयावरील स्थगन प्रस्तावावर बोलताना सभागृहात केला.
१ जानेवारीच्या अगोदर कोरेगाव-भीमा परिसरात काही संघटनांनी वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता. याची माहिती स्थानिक पोलिसांना होती. तरीही जाणीवपूर्वक १ तारखेला पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवला नाही. दंगल होऊ दिली असेही धनंजय मुंडे म्हणाले. दंगलीच्या घटनेला प्रतिक्रिया म्हणून लोकांनी रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला. यावेळी राज्यभर कोंबिंग ऑपरेशन राबवले गेले. औरंगाबाद येथे एका निष्पाप गरोदर महिलेवर स्वतः सीपींनी कारवाई करत अत्याचार केल्याची माहिती मिळाली आहे, असेही धनंजय मुंडे म्हणाले. या प्रकरणातील सर्व खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी ही त्यांनी केली.
या विषयावर सभागृहामध्ये २८९द्वारे चर्चा झाली पाहीजे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस पक्षाचे आमदार आज आक्रमक झाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कोरेगाव-भीमा प्रकरणातील आरोपींना अटक का करण्यात आले नाही, या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी विधान परिषदेमध्ये रणकंदन केल्याने विधान परिषदेचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले. आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. सभागृहामध्ये आमदार जयदेव गायकवाड यांनी गेल्या दोनशे वर्षांपासून असंख्य लोक कोरेगाव-भीमाला भेट देत आहेत. तसेच यावेळी मोठ्या प्रमाणावर लोक संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाऊनही दर्शन घेत असतात.मात्र यावर्षी काही समाजकंटक घटकांनी तिथे जमलेल्या अनुयायांवर पूर्वनियोजित असा भ्याड हल्ला केला. ज्यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. घटनेला दोन महिने उलटूनही अद्याप हल्लेखोर आणि त्यांच्या सूत्रधारांना अटक झालेली नाही. याबाबत शासन काय कारवाई करत आहे ? याबाबत २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडून सरकारला जाब विचारला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी कोरेगाव-भीमाचा प्रश्न गंभीर असून यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अॅड. जयदेव गायकवाड यांनी विधान परिषदेत २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडून सरकारतर्फे ठोस उत्तर मिळावे, अशी अपेक्षा केली. मात्र प्रश्नोत्तराच्या तासातच या प्रश्नाचा निकाल लावावा हे सरकारमधील सदस्य सांगत असून हे अतिशय दुःखद आहे, अशी टीका आमदार सुनील तटकरे यांनी केली.
आमदार विद्या चव्हाण यांनी कोरेगाव-भीमा प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटे व मनोहर भिडे यांनी जाणीवपूर्वक कटकारस्थान करत दंगल भडकावली. पोलिसांनी १ जानेवारी रोजी बघ्याची भूमिका घेतली होती. उलट जे भाविक तेथे आले होते अशा ५४ हजार लोकांवर पोलिसांनी केसेस दाखल केल्या. सरकारने एकबोटे व भिडेला लवकरात लवकर अटक करत निष्पाप लोकांवर ज्या केसेस दाखल झाल्यात त्या मागे घ्याव्यात अशी मागणी केली. आमदार प्रकाश गजभिये यांनी कोरेगाव-भीमा हे दलितांचे प्रेरणास्थान, स्फूर्तिस्थान आहे. दलितांच्या अस्मिता स्थळावर हल्ला करून एकप्रकारे जातीव्यवस्था आजही जिवंत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे याबाबत सभागृहात चर्चा झालीच पाहिजे, अशी मागणी केली. काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, भाई जगताप , आमदार जोगेंद्र कवाडे यांनी मत व्यक्त केले.