डिंक आणि मेथीचे लाडू हिवाळ्यातच का खातात?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 02:58 PM2023-11-19T14:58:12+5:302023-11-19T14:58:30+5:30
शरीराला ऊर्जा आणि उष्णतेची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात सध्या विविध भागात विशेष करून ग्रामीण भागात थंडीची चाहूल लागली आहे. दुपारी जरी गरम होत असले तरी सकाळच्या हवेत सध्या चांगलाच गारवा जाणवू लागला आहे. गेली अनेक वर्षे आपल्याकडे या काळात डिंकाचे आणि मेथीचे लाडू बनविले जातात.
अनेक ठिकाणी मेथी किंवा डिंक वापरून गूळ, खोबरे, सुका मेवा वापरून हे लाडू तयार केले जातात. अगदी न सांगता हे लाडू या काळात हमखास बनविले जातात. या दिवसात शरीराला ऊर्जा आणि उष्णतेची गरज असते, त्याची कसर डिंकाचे आणि मेथीचे लाडू भरून काढत असतात. त्यामुळे डिंक आणि मेथीचे लाडू हिवाळ्यात खाल्ले जातात.
या लाडवामधून तुम्हाला काय मिळते?
डिंक आणि मेथीच्या लाडूतून शरीराला अनेक गरज असणाऱ्या जीवनसत्त्वाची पूर्तता होत असते. मेथी किंवा डिंक आणि तेलबिया सोबत भरडलेले गहू किंवा बाजरी, नाचणीचे पीठ टाकले जाते. ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते तसेच मुबलक प्रमाणात जीवनसत्त्व मिळतात. दिवसभर कार्यरत राहण्यासाठी शरीराला ऊर्जेची खूप मोठ्या प्रमाणात गरज असते, ती या लाडूंमधून मिळू शकते. कुठलेही बाहेरचे पदार्थ खाण्याची गरज नाही. डिंक हाडांसाठी गुणकारी असल्यामुळे पाठीची हाडे मजबूत करते. याकरिता गरोदर महिलांना लाडू खायला दिले जातात. मात्र, ते योग्य प्रमाणात खाणे गरजेचे असते. यासाठी डॉक्टरांचा आवश्यक तो सल्ला घेतला पाहिजे.
थंडीमध्ये सुका मेवा आरोग्यासाठी लाभदायी
अनेक ठिकाणी थंडीच्या काळात विविध प्रकारचे लाडू करतात. त्यामध्ये हमखास त्या सुका मेव्याचा वापर केला जातो. यामध्ये उष्णता खूप जास्त असते. त्यामुळे पचायला जड जाऊ शकतो. त्यामुळे एकाचवेळी जास्त सुकामेवा खाऊ नये. सुकामेव्यामध्ये फॅटस, प्रोटीन आणि फायबर असे सगळे घटक असतात. योग्य प्रमाणात सेवन केल्यास हा मेवा आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. डॉक्टरही सुका मेवा खाण्याची शिफारस करत असतात.
हे लाडू करताना मेथी, डिंक आणि तेलबिया यांचा वापर केला जातो. यामधून शरीराला चांगले मेदाम्ले तर मिळतातच परंतु कॅल्शियम, आयर्न, फोलिक ॲसिड, झिंक, सेलेनियम , विटॅ. इ , ओमेगा ३ मेदाम्ल जे त्वचा, मेंदू व हाडांच्या बांधणीसाठी व हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक आहे. तसेच तेलबियांमध्ये प्रथिने व विटॅ. बी मुबलक प्रमाणात असतात जे हाडातील बोन मॅरो चांगले राहण्यासाठी व वाढ होण्याकरिता मदत करतात. डिंक आपल्याला चांगली ऊर्जा तर देतेच, पण आपल्या त्वचेचे व आतड्यांचे देखील आरोग्य चांगले ठेवण्यास यामुळे चांगली मदत करते. तसेच ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, त्यांचा त्रास कमी होण्यास याची खूप मदत होते.
शीतल चोले - नागरे, आहारतज्ज्ञ