भाजप एवढा ‘उद्धवग्रस्त’ का झालाय? उद्धव ठाकरेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 05:58 AM2023-06-20T05:58:37+5:302023-06-20T05:58:58+5:30
शिवसेनेचा ५७ वा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात शिवसैनिकांच्या तुफान गर्दीत, जल्लोषात साजरा करण्यात आला
मुंबई : गेल्या वर्षभरात आपल्या पक्षाचे नाव चोरले, वडीलही चोरायला निघाले होते. हे सर्व झाल्यावर उद्धव ठाकरेला काय किंमत उरली होती? तरीही केंद्रातील भाजपच्या नेत्यांना वारंवार राज्यात येऊन उद्धव ठाकरेचा जप का करावा लागतो? भाजपचे उद्धव ठाकरेंच्या नावाशिवाय पान हलत नाही. एकूणच भाजप एवढा ‘उद्धवग्रस्त’ का झाला आहे, असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केला.
शिवसेनेचा ५७ वा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात शिवसैनिकांच्या तुफान गर्दीत, जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर चौफेर टीका केली. मी उमेद हरलेलो नाही. पुन्हा त्याच हिमतीने उभे राहू. कितीही संकटे आले तरी त्याचा नेटाने सामना करू, अशा शब्दात त्यानी शिवसैनिकांना आश्वस्त केले.
गारदी, अवली, लव्हली आणि कावली...
आज इकडे गर्दी असून तिकडे गारदी आहेत. सगळेच अवली आहेत, पण लव्हली कोणीच नाही. तुम्ही अवली असले तरी जनता कावली आहे. तुम्ही सगळे मानसिक रुग्ण असून तुमच्यावर उपचारांची गरज असल्याचा हल्लाबोल त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर केला.
कोरोना प्रतिबंधक लस मोदींनी तयार केली, असा जावई शोध फडणवीस यांनी लावत हास्यजत्रेचा प्रयोग करून राज्यातील जनतेचे मनोरंजन केल्याची कोपरखळी त्यांनी हाणली.
बाता डबल इंजिनच्या; हिंदूंचा आक्राेश ऐकेनात
काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत हिंदूंना आक्रोश करावा लागत आहे. याचाच अर्थ केंद्रातील भाजप सरकार देश चालवायला लायक नाही. डबल इंजिन सरकार केवळ हवेतच वाफा सोडत आहे.
पुन्हा भगवा फडकवणार
शिवसेना ही धक्काप्रूफ आहे. ज्यांच्या हृदयात बाळासाहेब आहेत असे शिवसैनिक माझ्यासोबत आहेत तोवर कसलीही चिंता नाही. पुन्हा एकदा त्याच ताकदीने भगवा फडकवू. राज्यातही गद्दार आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांच्या छाताडावर पुन्हा एकदा भगवा फडकवणारच.
- उद्धव ठाकरे