मुंबई-
नागपूर हिवाळी अधिवेशनात नागपूर न्यास जमिनीच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं जात आहे. आता खासदार संजय राऊत यांनीही याच प्रकरणावरुन शिंदे आणि फडणवीसांवर निशाणा साधला आहे. तुम्ही कितीही रंग सफेदी कराल? भूखंड घोटाळा अतिशय गंभीर आहे तरीसुद्धा तुम्ही नाक वर करुन बोलत आहात. मला एक कळत नाही फडणवीस भ्रष्टाचाराच्या पाठिशी कशाला उभं राहत आहेत? यात काय तुमची मांजर-बोक्यासारखी वाटणी झाली आहे का?, असा सवाल उपस्थित कर संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
नागपूर न्यास जमिनीचा मुद्दा न्याय प्रविष्ठ असतानाही महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन नगरविकास मंत्री आणि आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप विरोधकांनी केला. अमायकस क्युरीनं या प्रकरणात सरकारी हस्तक्षेप झाल्याची नोंद केल्याचं विरोधकांनी सभागृहात सांगितलं. यावरुन विरोधक आक्रमक झालेले असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उत्तर दिलं. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांच्या आरोपांना खोडून काढत शिंदे यांची पाठराखण केली.
फडणवीस यांनी विरोधकांनी केलेले आरोप म्हणजे 'खोदा पहाड और चुहा भी नही निकला' असा असल्याचं म्हटलं. यावरच संजय राऊत यांनी निशाणा साधला. "तुमचा निर्णय जर योग्य होता मग हायकोर्टानं स्थगिती का दिली याचं उत्तर द्या. बाकीचं काही सांगत बसू नका. तुम्ही किती रंग सफेदी कराल? घोटाळा झाला आहे आणि फडणवीस भ्रष्टाचाऱ्यांना का पाठिशी घालत आहेत? यात काय त्यांनाही वाटणी मिळालीय का? मांजर- बोक्याची वाटणी झाली आहे का?", असं संजय राऊत म्हणाले.
अमित शहांनी नेमकं काय केलं?सीमावादावरुनही संजय राऊत यांनी सरकारला धारेवर धरलं. ग्रामपंचायतीच्या निकालांचं सेलिब्रेशन करत आहात पण आधी महाराष्ट्रातील गावं कर्नाटकात चाललीत ते पाहा. सीमावादावरुन शेजारील राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला बेअब्रू करत आहे तरी तुम्ही बोटचेपीची भूमिका घेत आहात. दिल्लीत अमित शाहांसोबत बैठक झाली म्हणजे नेमकं काय झालं? नेमकी कसली मध्यस्थी केली? त्या बैठकीनंतरही बोम्मई महाराष्ट्राला ब्रेअब्रू करत आहेत. त्यांचं तोंड बंद झालेलं नाही, असं संजय राऊत म्हणाले.