मुंबईत का वाढतेय अमली पदार्थांची तस्करी?
By मनोज गडनीस | Updated: March 3, 2025 10:59 IST2025-03-03T10:56:17+5:302025-03-03T10:59:52+5:30
संपूर्ण देशालाच अमली पदार्थांचा विळखा पडला आहे का, असे वाटावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

मुंबईत का वाढतेय अमली पदार्थांची तस्करी?
क्राइम डायरी, मनोज गडनीस, विशेष प्रतिनिधी
ये तेरा दिल नही, कोकेन हैं !, प्रेमाची भावना नैसर्गिकरीत्या व्यक्त करता न येणाऱ्या तरुणाला ती भावना व्यक्त करण्यासाठी अमली पदार्थांचा आसरा घ्यावा लागला. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या ‘उडता पंजाब’ या सिनेमातील या संवादाने पंजाबमधील अमली पदार्थांच्या नशेचे सामाजिक वास्तव दाखवले होते. अनेक पिढ्या यामध्ये कशा बरबाद झाल्या, याचा आरसा या सिनेमाने लोकांना दाखवला. पण, आता पंजाबच नव्हे, तर संपूर्ण देशालाच अमली पदार्थांचा विळखा पडला आहे का, असे वाटावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मुंबईबद्दलच बोलायचे झाले तर, गेल्यावर्षी मुंबईमध्ये विविध तपास यंत्रणांनी मिळून किमान दोन हजार कोटींपेक्षा जास्त किमतीचे अमली पदार्थ पकडले. अमली पदार्थांच्या विक्रीमध्ये वर्षागणिक सातत्याने वाढ होताना दिसत आहे. ही आकडेवारी केवळ पकडलेल्या अमली पदार्थांची आहे. तर जे अमली पदार्थ पकडले गेले नसतील ती किती असेल, याची कल्पनाही करता येणार नाही. मात्र, यावरून एक निष्कर्ष काढता येईल की, दिवसेंदिवस समाजाच्या विविध स्तरांभोवती अमली पदार्थ आपला विळखा घट्ट करत आहेत. तपास यंत्रणा जसजसा अमली पदार्थांविरोधातला पाश घट्ट करत आहेत, तसतसे तस्करीचे नवे मार्ग तस्कर शोधत आहेत.
बँकॉक, मलेशिया येथून प्रामुख्याने मुंबईत अमली पदार्थ येत आहेत. काही जण बॅगांतून, फळांच्या बॉक्समधून, शरीरात (गुदद्वारात) लपवून, अमली पदार्थांच्या गोळ्या गिळून, अशा विविध मार्गांनी अमली पदार्थ परदेशातून आणत आहेत. तर, उत्तर-पूर्वेतील राज्यांच्या लगतच्या सीमेवरूदेखील देशामध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ येत आहेत. ते तिथून रस्त्यामार्गे देशभरात पसरत आहेत.
लोक या नशेच्या इतके आहारी गेले आहे की, मध्यंतरी मुंबईत एका व्यक्तीने घरच्या गच्चीमध्ये गांजाची लागवड केल्याचे दिसून आले. गांजा, कोकेन, हेरॉईन, मानसोपचाराची औषधे या अमली पदार्थांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एक किलो गांजाची किंमत एक कोटी इतकी आहे. गांजा आणि कोकेन या दोन घटकांना सर्वाधिक मागणी आहे. जे लोक या नशेच्या विळख्यात आहेत, त्यांना गल्लीबोळातून हे अमली पदार्थ उपलब्ध होत आहेत. मुंबई विमानतळावर तर जवळपास प्रत्येक दिवशी किमान एक ते दोन कारवायांमध्ये अमली पदार्थ पकडले जात आहेत.
आजच्या घडीला मुंबई पोलिसांचे अमली पदार्थ विरोधी पथक, नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्यूरो (एनसीबी), केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणा (डीआरआय), सीमा शुल्क विभाग, अशा तीन केंद्रीय यंत्रणा सातत्याने अमली पदार्थांच्या विरोधात सक्रिय कारवाई करत असल्या, तरी या यंत्रणांची दमछाक होईल, इतक्या प्रमाणात अमली पदार्थ मुंबईत येत आहेत. यावरून नशेच्या विळख्याची तीव्रता लक्षात येते.