Join us

"इंडिया आघाडी विचित्र का वागतेय?"; सुजात आंबेडकरांचा रोखठोक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 12:18 PM

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत.

मुंबई - देशात ५ राज्यातील विधानसभा निवडणुकांचे लवकरच रणशिंग फुंकले जात आहे. त्यातच आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला सत्तेतून पायउतार करण्यासाठी सर्वच राजकीय विरोधी पक्षांनी मोट बांधली आहे. मात्र, या इंडिया आघाडीतवंचित बहुजन आघाडी व एमआयएम पक्षांना निमंत्रण देण्यात आले नाही. त्यामुळे, दोन्ही पक्ष जाहीरपणे इंडिया आघाडीवर टीकास्त्र सोडत आहेत. दरम्यान, राज्यातील सर्व ४८ लोकसभेच्या जागांवर वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. आता, सुजात आंबेडकर यांनीही इंडिया आघाडीवर निशाणा साधला आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सत्ताधारी भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांनी एकजुट दाखवली असून 'इंडिया' या आघाडीची स्थापना केली आहे. इंडिया आघाडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेस 'इंडिया' आघाडीचा भाग आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीला या आघाडीत स्थान मिळाले नाही. त्यामुळे, त्यांनी एकला चलो रे चा नारा दिला आहे. तर, सुजात आंबेडकर यांनी इंडिया आघाडी विचित्रपणे का वागतेय, असा सवालही केला.

कार्यकर्ता म्हणून आम्ही सर्वांचीच भावना आहे की, भाजपला हरवायला इंडिया आघाडीने वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण द्यायला पाहिजे. या आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश केला पाहिजे. कारण, पहिल्याच निवडणुकीत ४२ लाख मतं घेणारा हा पक्ष नक्कीच इंडिया आघाडीची ताकद वाढवू शकतो, अशा शब्दात वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी इंडिया आघाडीतील सहभागावर भाष्य केलंय.  

महाराष्ट्रात भाजप व आरएसएसला हरवायला हा निर्णायक ठरू शकतो. पण, इंडिया आघाडी का विचित्र वागतेय. त्यांच्याकडून वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण का येत नाही. तसेच, वंचितांसाठी त्यांचे दरवाजे बंद का आहेत, हा प्रश्न आम्हाला पडलाय, असेही सुजात आंबेडकर यांनी म्हटले. 

लोकसभेच्या ४८ जागा लढवणार - आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले की, त्यांचा पक्ष २०२४ च्या निवडणुकीत सर्व ४८ लोकसभेच्या जागा लढवेल. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, २०२४ च्या निवडणुकीत आम्ही लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढवू. लोकसभा निवडणुकीची तयारी पक्षाने सुरू केली असून, मी अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले.  

टॅग्स :प्रकाश आंबेडकरवंचित बहुजन आघाडीइंडिया आघाडीभाजपा