मुंबई : एका पोलिसाने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या वकीलाचा एफआयआर इंग्रजीत नोंदवल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने अँण्टॉप हिल पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरले. कोणत्या तरतुदीनुसार एफआयआर इंग्रजीत नोंदवला याचा जाब विचारात संबंधित पोलीस अधिकाऱ्याला खंडपीठाने खडसावले इतकेच नव्हे तर या प्रकरणी २५ ऑक्टोबर पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
अॅण्टॉप हिल पोलीस ठाण्याच्या निष्क्रियते विरोधात वकील साधना जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर नुकतीच न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. याचिकाकर्त्यांनी सविस्तर तक्रार पोलिसांकडे नोंदवली होती इतकेच नव्हे तर मुंबई झोन ४ च्या डिसीपींना याबाबत २० मे २०२३ रोजी माहिती देण्यात आली होती.
तक्रार नोंदवून घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने एफआयआर नोंदवताना डॉ. प्रवीण मुंढे, डीसीपी झोन-४ मुंबई यांचे नाव त्यातून हटवण्याची काळजी देखील घेतली नाही, इतकेच काय तर ही तक्रार इंग्रजीत नोंदवण्यात आल्याबद्दल खंडपीठाने आश्चर्य व्यक्त केले. पोलिसांच्या या कृती ची गंभीर दखल घेत खंडपीठाने पोलिसांना सुनावले एफआयआर मराठीत नोंदवावा असे गृह विभागाचे परिपत्रक आहे.
इतकेच काय तर राज्याची भाषा देखील मराठी असताना एफआयआर इंग्रजीत दाखल करण्याचे कारण काय असे खंडपीठाने पोलिसांना सुनावले तसेच याबाबत प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने पोलीस अधिकारी मनोज महादेव यांना दिले.