Join us

मोनोरेल पांढरा हत्ती का ठरतोय?

By सचिन लुंगसे | Published: September 30, 2024 9:49 AM

मोनोचे दहा रेक घेण्यासाठी एमएमआरडीएने दोन वर्षांपूर्वी ५५६ कोटी रुपयांचे टेंडर काढले होते. त्यानंतर मोनोच्या ताफ्यात एक रेक दाखल झाला आहे.

- सचिन लुंगसेउप-मुख्य उपसंपादक

चेंबूर- वडाळा- संत गाडगे महाराज चौक या मार्गावर धावणारी मोनोरेल २०२३ साली वार्षिक ५०० कोटी रुपयांच्या तोट्यात होती आणि आजही या आकड्यांत फार काही फरक पडलेला नाही. २०२३ साली आयुक्त संजय मुखर्जी यांनी ५०० कोटींचा उल्लेख करताना तोट्यातल्या प्रकल्पांचा अभ्यास सुरू असल्याचे सांगितले होते. आता २०२४ सुरू असून, पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला मोनोरेल फायद्यात आणता आलेली नाही. त्यामुळे पांढरा हत्ती ठरणारी मोनोरेल पोसायची कशी ? हा यक्ष प्रश्न एमएमआरडीए समोर आहे.

एमएमआरडीएचे माजी महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्या काळात नव्याने १० मोनोरेल आणण्याबाबत काम सुरू झाले होते. कालांतराने महानगर आयुक्तपदी संजय मुखर्जी आले. त्यांनी तोट्यातल्या प्रकल्पांचा अभ्यास सुरू केला. तेव्हा मुखर्जी यांनी मेट्रो दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व आणि दहिसर पूर्व ते डी. एन. नगर या दोन्ही मेट्रो २३ कोटी रुपयांच्या तोट्यात धावत असल्याचे सांगितले होते. मोनोरेलचाही विचार केला गेला. मेड इन इंडिया म्हणून मोनोरेलचे कोच भारतात बनविण्याचा विचार सुरू झाला. मार्च २०२३ मध्ये मुंबईकरांना अधिक वेगवान प्रवासाचा अनुभव देण्याकरिता प्राधिकरणाच्या वतीने मोनोरेलच्या ताफ्यामध्ये पुढील वर्षी म्हणजे २०२४ आणखी १० मोनोरेल दाखल केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मोनोच्या गाड्या वाढविताना प्रवासी कसे वाढतील ? याकडे फार लक्ष दिले गेले नाही. मुळातच मोनोचा मार्ग हा जेथून जातो त्या पटटयात रहदारी कमी आहे किंवा कार्यालये कमी आहेत.मोनोची जोडणी ज्या ठिकाणी देण्यात आली आहे; ती प्रवाशांच्या पसंतीस उतरली नाही किंवा व्यवहार्य झाली नाही, कारण चेंबूरहून वडाळा गाठण्यासाठी मुंबईकर हार्बर रेल्वे मार्गाला प्राधान्य देतात. लोकलचा प्रवास पैशाच्या व वेळेच्या तुलनेने परवडतो हे त्यामागचे गणित आहे. वेळेचे गणित पाहता दोन मोनोमधील अंतर खूप जास्त आहे. त्याचवेळी लोकल मात्र प्रवाशांना तुलनेने जलद सेवा देते. चेंबूरहून महालक्ष्मी किंवा महालक्ष्मीहून चेंबूर गाठायचे म्हटले, तरी प्रवासी चेंबूर-कुर्ला-दादर-महालक्ष्मी असा अपडाऊन प्रवास करतात, कारण लोकलची जोडणी वेगवान आहे.

मोनोचे दहा रेक घेण्यासाठी एमएमआरडीएने दोन वर्षांपूर्वी ५५६ कोटी रुपयांचे टेंडर काढले होते. त्यानंतर मोनोच्या ताफ्यात एक रेक दाखल झाला आहे. आजघडीला मोनोमधून दिवसभरात सुमारे १२ ते १५ हजार प्रवासी प्रवास करत आहेत, तर एमएमआरडीएकडे ९ मोनो असून, दिवसाला मोनोच्या १४७ फेऱ्या होत आहेत. शिवाय मोनोला महालक्ष्मी रेल्वे स्थानकाशी जोडण्याकरिता ट्रव्हलेटरसाठी ७० कोटींचे टेंडर काढण्यात आले होते. याचे काम अपूर्ण आहे. मोनोच्या या सेवांत वाढ करण्यासाठी प्राधिकरण प्रयत्न करत असले, तरी मेट्रो, मोनो, लोकल आणि बेस्टची कनेक्टिव्हिटी व्यवस्थित होत नाही तोवर आर्थिक दृष्टचक्र संपणार नाही.

टॅग्स :मोनो रेल्वे