मुंबई : मायग्रेन हा एक न्युरोलॉजिकल डिसऑर्डर (मज्जातंतूंशी निगडित आजार) आहे. अनेकांना विशेष करून महिलांना हा त्रास विशेष अधिक प्रमाणात होत असतो. झोप पूर्ण न झाल्याने किंवा स्क्रीन टाइम वाढल्यामुळे अनेकांचा मायग्रेनचा त्रास वाढत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. ही समस्या असणाऱ्या नागरिकांमध्ये तीव्र डोकेदुखी होते. त्यांना दिवसभरातील दैनंदिन काम करणे अवघड होऊन बसते. अनेकांना तर या काळात उलट्या, मळमळ, छातीत धडधडसुद्धा होते. या आजारांवर औषधोपचाराने नियंत्रण मिळविता येते. त्यासाठी आहारामध्येही काही बदल करावे लागतात आणि पथ्य पाळावी लागतात.
काय आहे मायग्रेन?
मज्जातंतूंची निगडित हा समस्या आहे. अनेक वेळा हार्मोन्स बदलामुळे सुद्धा हा आजार गंभीर होत असल्याचे डॉक्टर सांगतात. मायग्रेनची डोकेदुखी दीर्घकाळ राहिल्यास त्यामुळे अनेक गंभीर परिस्थितीही निर्माण होऊ शकते. या आजाराची योग्यवेळी काळजी घेणे गरजेचे असते.
- नेमके असे कारण नसले तरी काही वेळा आनुवंशिकसुद्धा हा आजार असू शकतो. - काही वेळा वेळेत जेवण न केल्यामुळे सुद्धा मायग्रेनचा त्रास जाणवत असतो. त्यामुळे जेवणाच्या वेळा व्यवस्थित असणे गरजेचे आहे. - मोठा प्रकाश झोत अचानक डोळ्यावर येणे, तसेच कॅफेनयुक्त पदार्थाचे सेवन करणे.
अनेक वेळा नागरिक डोकेदुखी म्हणून येतात. त्यामध्ये या आजराचे निदान होणे गरजचे असतात. या आजरात योग्य त्या गोळ्या देऊन वेदना कमी करता येऊ शकतात. मात्र, कालांतराने हा आजार पुन्हा उद्भवू शकतो. त्यामुळे या आजार असणाऱ्या रुग्णांनी आहाराचे पथ्य पाळणे गरजेचे असते. - डॉ. विनायक सावर्डेकर, सहयोगी प्राध्यापक, सेंट जॉर्जेस रुग्णालय
ही घ्या काळजी :
भरपूर पाणी पिणे. वेळेवर जेवण करणे अति मसालेदार पदार्थ खाऊ नये. मंद स्वरूपाचे दिवे घरात असावेत. व्यसनांपासून दूर राहणे. ताण-तणाव जास्त करून घेऊ नये