लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कांदिवली येथील ठाकूर व्हिलेजमधील मशिदीवरील भोंग्यामुळे होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाबाबत तक्रार केल्यानंतर काय कारवाई करण्यात आली, याची माहिती २९ मेपर्यंत देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना शुक्रवारी दिले.
ठाकूर व्हिलेज येथील ईएसआयएस रुग्णालयाजवळील मशिदीवरील भोंग्यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश ३ मे रोजी देऊनही अद्याप काहीही कारवाई न करण्यात आल्याने व्यवसायाने वकील असलेल्या रिना रिचर्ड यांनी उच्च न्यायालयाच्या सुटीकालीन खंडपीठापुढे अंतरिम अर्ज दाखल केला. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भोंग्यावर कारवाई करण्याबाबत समतानगर पोलिसांकडे ८ मे व १४ मे रोजी तक्रार केली. तरीही त्यांनी काहीही कारवाई केली नाही. पोलिसांना कारवाई करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
आतापर्यंत या दोन तक्रारींवर काय कारवाई करण्यात आली, याची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे २९ मेपर्यंत सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या सुटीकालीन खंडपीठाने मुंबई पोलिसांना दिले. रुग्णालयाजवळ असलेल्या मशिदीच्या भोंगयामुळे रुग्णांना त्रास होत असल्याने त्यावर कारवाई करण्यात यावी, यासाठी रिचर्ड यांनी २०१७ मध्ये न्यायालयात याचिका दाखल केली. २०१८ मध्ये अवमान याचिका दाखल केल्यानंतर मशिदीवरील भोंगा हटविण्यात आला होता. मात्र, २०२२ मध्ये पुन्हा बसविण्यात आला. मूळ याचिकेवरील सुनावणी १२ जून रोजी आहे. मात्र, पोलिस काहीच कारवाई करत नसल्याने रिचर्ड यांनी अंतरिम अर्ज दाखल केला.