Walmik Karad ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींवर कारवाई व्हावी ही मागणी राज्यभरातून सुरू आहे. मस्साजोग येथील पवनचक्की कंपनीकडे खंडणी मागितल्याच्या आरोपा प्रकरणी वाल्मीक कराड याला सीआयडीने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आता खासदार सुप्रिया सुळे यांनी वाल्मीक कराड याच्यावर गंभीर आरोप केले आहेत, तसेच ईडीची नोटीस दाखवत ईडीने त्यावेळी कारवाई का केली नाही?, असा सवाल उपस्थित केला आहे.
Maharashtra Politics : आदित्य ठाकरेंनी सलग तीनवेळा देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट; नेमकं कारण काय?
"बीड प्रकरणात पहिला आवाज संसदेत बजरंग सोनवणे यांनी उठवला. क्रुर घटना झाली आहे, या प्रकरणात न्याय मिळावा. जोपर्यंत त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही राजकारण बाजूला ठेवत आहे. अंजली दमानिया याही काही दिवसापासून पाठपुरावा करत आहेत. पीएमएलएचा कायदा काळा पैसा रोखण्यासाठी केला आहे. हा कायदा युपीए सरकारने आणला. आता हे सगळं केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अंतर्गत येते. आता कराड याला आधीच ईडीची नोटीस आली आहे. आता माझा केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारला प्रश्न आहे की, वाल्मीक कराड याला खंडणी प्रकरणी अटक झाली आहे तर ईडी आणि पीएमएल का लावले नाहीत, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, यात आता गेल्या काही दिवसापूर्वी संजय राऊत, अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यावर पीएमएलए लावले. मग आता आवदा कंपनीने या प्रकरणी तक्रार देऊनही हे का लावण्यात आले नाही?, असंही सुळे म्हणाल्या. २०२२ मध्येच वाल्मीक कराड याला नोटीस आली होती, तरीही कारवाई का केली नाही. अनिल देशमुख यांच्यावर ऐकीव तक्रारीवर कारवाई केली होती. पण, आठ महिने पूर्ण होऊनही ईडीने अजूनही कारवाई का केली नाही. आता आम्ही या प्रकरणी अर्थमंत्र्यांची भेट घेणार आहे. जर अशा गोष्टी झाल्या तर आपल्या महाराष्ट्रात कोण गुतंवणूक करेल का? गुंतवणूकदारांनी यावर तक्रार केली आहे, त्यांनाही न्याय मिळत नाही.
"संतोष देशमुख यांची हत्या ही एक आणि खंडणी प्रकरणाची एक केस अशा दोन तक्रारी आहेत. पोलिसांनी आधीच कारवाई केली असती तर संतोष देशमुख यांची हत्या झालीच नसती, असंही सुळे म्हणाल्या.
'लाडकी बहीण योजनेचे ते आजही अध्यक्ष'
लाडकी बहीण योजनेच्या परळी तालुक्याचे अध्यक्ष वाल्मीक कराड आहेत. ते आजही त्या पदावर आहेत. जो व्यक्ती खंडणी प्रकरणाचा गुन्हेगार आहे त्या व्यक्तीला तुम्ही लाडकी बहीण योजनेचा तालुका अध्यक्ष करता. अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत यांना एक कायदा आणि वाल्मीक कराड यांना एक कायदा असं का आहे?, हा विषय आता आम्ही संसदेत मांडणार आहे, असंही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.