Join us

हीच का तुमची कचरामुक्त मुंबई? वर्षा गायकवाड यांचा पालिकेला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 5:43 PM

काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी मुंबईतील कचऱ्यावरुन पालिकेवर टीका केली.

मुंबई महापालिकेने कचरामुक्त मुंबईची घोषणा करत कोट्यवधी रुपयांचा खर्च केला असला, तरी प्रत्यक्षात कचरामुक्त मुंबईचे स्वप्न दूरच राहिल्याचं वास्तव आमदार वर्षा गायकवाड यांनी उघडकीस आणलं आहे. धारावीतील इंदिरानगर परिसरातील कचऱ्याच्या साम्राज्याचे फोटो त्यांनी आपल्या ट्विटरवरुन शेअर करत पालिकेच्या कचरामुक्त मुंबईच्या दाव्यावर टीका केली. अशा दुर्गंधीयुक्त वातावरणात लोकांनी कसं जगायचं, असा सवालही त्यांनी केला. 

गणेशभक्तांना टोलमाफी जाहीर! जीआर निघाला, कधीपासून? कसा आणि कुठे काढाल पास...

मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर आमदार वर्षा गायकवाड सक्रीय  झाल्या आहेत. त्यांनी आपल्या मतदारसंघापासून सुरुवात करत मुंबईतील विविध प्रश्नांना वाचा फोडायला सुरुवात केली आहे. याच अभियानाचा भाग म्हणून त्यांनी धारावीतील इंदिरा नगर परिसराला भेट दिली. इंदिरा नगर परिसरात पसरलेलं कचऱ्याचं साम्राज्य पाहून त्यांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरलं.

दरम्यान, धारावी परिसरातील नाईक नगर भागातील एक सार्वजनिक शौचालय नागरिकांचा विरोध असतानाही पालिकेने जमीनदोस्त केले. या भागात पाच हजारांपेक्षा जास्त लोकवस्ती आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांची पर्यायी व्यवस्था न करता स्वच्छतागृह तोडणे पालिकेच्या नियमात बसत नाही. तरीही आपलेच नियम पायदळी तुडवत  सार्वजनिक स्वच्छतेसाठीची सुविधा तोडण्याची तत्परता दाखवणारी महापालिका कचऱ्याच्या बाबतीत एवढी उदासीन का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

मुंबई महापालिकेने कचरामुक्त मुंबईची घोषणा करत त्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली होती. मात्र सुशोभीकरणाच्या नावाखाली थातुरमातूर रंगरंगोटी करून काही ठिकाणी दिवे बसवून करदात्यांचे पैसे लुटण्याचं कारस्थान सत्ताधाऱ्यांनी केल्याचा आरोप आ. गायकवाड यांनी केला. 

टॅग्स :मुंबईवर्षा गायकवाडकाँग्रेस