पार्सल कुरिअर व जाहिरातीला एक आणि हॉटेल, स्टॉल आस्थापना यांना वेगळा न्याय का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:07 AM2021-01-14T04:07:17+5:302021-01-14T04:07:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत २० विषय होते, त्यामध्ये पार्सल कुरिअर व जाहिरातीला भाडेमाफी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत २० विषय होते, त्यामध्ये पार्सल कुरिअर व जाहिरातीला भाडेमाफी देण्यात आली, यासह १९ विषयांवर निर्णय झाले. मात्र, हॉटेल आणि स्टॉल आस्थापनांच्या परवाना शुल्कमाफीच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यात आला नाही.
पार्सल कुरिअर व जाहिरातीला एक आणि हॉटेल, स्टॉल आस्थापना यांना वेगळा न्याय का, यामध्ये काही देवाणघेवाणीमुळे प्रस्ताव राखून ठेवला आहे का, अशी चर्चा एसटी महामंडळात आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत काही विषय चर्चेला होते. त्यामध्ये पार्सल कुरिअर व जाहिरात विभागाला भाडेमाफी आणि हॉटेल, स्टॉलला परवाना शुल्कमाफीचा विषय होता. एसटी बसस्थानकात हॉटेल आणि स्टॉल ५०० हून अधिक आहेत. पार्सल कुरिअर व जाहिरात आणि हॉटेल, स्टॉलची वर्षाला कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. भाडेमाफी किंवा शुल्कमाफी दिल्यास एसटीला मोठे नुकसान होईल. मात्र, तरीही हे दोन्ही विषय पटलावर मांडण्यात आले. या दोन्ही विषयांत पार्सल कुरिअर व जाहिरात विभागाला भाडेमाफी दिली, तर हॉटेल, स्टॉल आस्थापना यांचा परवाना शुल्कमाफीचा विषय राखून ठेवण्यात आला आहे. त्यांनी देवाणघेवाणीसाठी त्यांचा प्रस्ताव राखून ठेवला का, अशी चर्चा महामंडळात सुरू आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आस्थापनांना भाडेमाफी, शुल्कमाफी देण्यात येत आहे, त्याअंतर्गत हा निर्णय झाला असेल. हॉटेल आणि स्टॉलबाबत पुढील बैठकीत निर्णय होऊ शकेल.
वरिष्ठ अधिकारी, एसटी महामंडळ