Join us

ठाकरेंची साथ सोडून शिंदेंसोबत का गेले?; पक्षप्रवेश करताच रवींद्र वायकरांनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 11:01 PM

शिवसेनेत प्रवेश करताना रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक करत पक्षांतरामागील आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे.

Shivsena Ravindra Waikar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का देत त्यांच्या पक्षातील आमदार रवींद्र वायकर यांना आपल्याकडे खेचण्यात यश मिळवलं आहे. रवींद्र वायकर यांनी रविवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आपल्या कार्यकर्त्यांसह शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मागील काही आठवड्यांपासून वायकर यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू होती. त्यानुसार आज त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत भगवा हाती घेतला. शिवसेनेत प्रवेश करताना रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक करत पक्षांतरामागील आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे.

रवींद्र वायकर म्हणाले की, "माझ्या विधानसभा मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. काही धोरणात्मक निर्णय सत्तेत असल्याशिवाय होऊ शकत नाहीत. धोरणात्मक निर्णय घेण्यासाठीच मतदारसंघातील लोक आपल्याला निवडून देत असतात. आज देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची सत्ता आहे. देशाचा कारभार ते चांगल्या पद्धतीने करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील तातडीने निर्णय घेतात. त्यामुळे मी माझ्या मतदारसंघातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आलो आहे," असा दावा वायकर यांनी केला.

दरम्यान, रवींद्र वायकर यांनी पक्षप्रवेश सोहळ्यानंतर लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातात आपल्या मागण्यांची कागदपत्रे दिली. त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलं आहे.

उद्धव ठाकरेंसाठी धक्का

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निष्ठावान समजल्या जाणाऱ्या आमदाराने साथ सोडल्याने उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे. मागील काही महिन्यांपासून रवींद्र वायकर यांच्यामागे केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा लागला होता.  जोगेश्वरी येथे एका तारांकित हॉटेलच्या बांधकाम व व्यवहारात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून ही चौकशी सुरू होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी ९ जानेवारी रोजी वायकर यांचे निवासस्थान, मातोश्री क्लब तसेच त्यांच्या व्यावसायिक भागीदारांच्या निवासस्थानी अशा एकूण ७ ठिकाणी छापेमारी केली होती. जोगेश्वरी पूर्व येथील एका भूखंडावर बांधकाम होत असलेल्या पंचतारांकित हॉटेलच्या बांधकामाकरिता वायकर यांनी त्यापूर्वीचे काही करार लपवल्याचा आरोप होता. 

टॅग्स :रवींद्र वायकरएकनाथ शिंदेउद्धव ठाकरे