Join us

एसटी महामंडळ अपहार करणाऱ्यांवर मेहेरबान का? समितीमार्फत चौकशी करून कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 7:02 AM

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई :   एसटी महामंडळाच्या बसचे जाळे सर्वत्र पसरले आहे. महामंडळाला उत्पन्न मिळवून देण्यासाठी बसमधील वाहकांची ...

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई :  एसटी महामंडळाच्या बसचे जाळे सर्वत्र पसरले आहे. महामंडळाला उत्पन्न मिळवून देण्यासाठी बसमधील वाहकांची मोठी भूमिका असते. यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. मात्र, काही वाहक या बाबींचा गैरफायदा घेतात. यामुळे मार्ग तपासणी पथक सुरक्षा-दक्षता खात्यामार्फत वाहकांच्या हालचालीवर  लक्ष ठेवते.  मात्र आता या कारवाई शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे एसटी महामंडळ अपहार करणाऱ्यांवर मेहेरबान का? असा सवाल अधिकारी उपस्थित करत आहेत. 

एसटीला संप आणि कोरोनामुळे  मोठे नुकसान सोसावे लागले, मात्र महिला सन्मान योजना आणि ज्येष्ठ नागरिक अमृत योजना यामुळे प्रवासी संख्या वाढली.  त्यामुळे एसटीला उभारी मिळत आहे. मात्र काही वाहकांनी अपहार केल्याचे समोर आले आहे. तीन अपहार केल्यास थेट बदली करण्यात येते. त्यामुळे वाहकांवर वचक होता. मात्र आता त्यांना पाठीशी घालण्याचे प्रयत्न केले जात आहेत. समितीमार्फत चौकशी करून नंतर कारवाई केली जाणार आहे. 

तिसऱ्यांदा अपहार केल्यास बदलीनवीन  परिपत्रकानुसार प्रवासभाडे वसूल करून तिकीट न देणेबाबत अपहाराच्या तिसऱ्या व त्यानंतरच्या गुन्ह्याप्रकरणी वाहकाची संबंधित विभागातील अन्य आगारामध्ये बदली केली जाणार आहे. याप्रकरणी विभाग नियंत्रक, विभागीय वाहतूक अधीक्षक व विभागीय कर्मचारीवर्ग अधिकारी यांची समिती गठित करण्यात येणार आहे. ही समिती बसमधील आसन क्षमता, उभे व बसलेले प्रवासी संख्या, वाहकाचे उत्पन्न, प्रवाशांची चढ-उतार या व इतर अनुषंगिक बाबी विचारात घेऊनतपासणी करेल.

तीन अपहारानंतर  वाहकांची थेट बदली करण्यात येत होती. परंतु  वाहकांकडून अनेक तक्रारी येत होत्या. त्यामुळे आता समितीमार्फत चौकशी करून बदली केली जाणार आहे. - अजित गायकवाड, महाव्यवस्थापक, कर्मचारी वर्ग व औद्योगिक संबंध

कोरोना काळातही अपहार कोरोना काळात वाहतुकीवर काही निर्बंध होते. तरीही १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२  दरम्यान मार्ग  तपासणीत १०५४० प्रकरणे समोर आली होती. त्यातून ७०५०७१ रुपयांचे भाडे व  दंड वसूल करण्यात आला.

टॅग्स :एसटी