Join us

आमदार प्रकाश सुर्वेंचे FIRमध्ये नाव का नाही? अपहरणप्रकरणी ठाकरे गटाचा पोलिसांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 7:15 AM

गोरेगावमधील व्यावसायिक राजकुमार सिंग यांना बंदुकीच्या धाकात धमकावणारा आमदारपुत्र राज सुर्वे अजूनही पसार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गोरेगावमधील व्यावसायिक राजकुमार सिंग यांना बंदुकीच्या धाकात धमकावणारा आमदारपुत्र राज सुर्वे अजूनही पसार आहे. त्याने सिंग यांचे अपहरण करण्यापूर्वी त्यांना आमदार प्रकाश सुर्वेंच्या कार्यालयातून बोलत असल्याची धमकी देणारा फोन केला होता. या घटनेचा उल्लेख एफआयआरमध्ये आहे. मात्र, आमदार प्रकाश सुर्वे यांचे नाव त्यात का नाही, असा सवाल शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने मुंबई पोलिसांना केला आहे. त्यासंदर्भात अपर पोलिस आयुक्तांची भेट घेऊन आमदार पिता-पुत्राच्या गुन्ह्यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. 

मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने शनिवारी सकाळी अपर पोलिस आयुक्त (उत्तर विभाग ) राजीव जैन यांची माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली. वनराईतील खंडणी प्रकरणानंतर त्यांनी विद्यमान आमदार प्रकाश सुर्वे आणि त्यांच्या साथीदारांकडून गुंडगिरी, खंडणी, धमक्या देणे, दहशत पसरविणे यामार्फत कायदा व सुव्यवस्थेची चिंताजनक परिस्थिती निर्माण करण्याचा आरोप केला. ही बाब त्यांनी जैन यांना एका लेखी निवेदन देत मांडली.

पोलिस तक्रार घेतच नाहीत...

विकासकांना धमकी देणे, मुलाला प्रोजेक्टमध्ये पार्टनर घ्या अशी जबरदस्ती करणे, विकासकांच्या साइटवर आमची सुरक्षा व्यवस्था ठेवा यासाठी दबाव आणणे असे प्रकार आमदाराकडून केले जात असल्याचे निवेदनात म्हणण्यात आले आहे. या सगळ्या प्रकरणात घाबरून लोक तक्रार करायला पुढे येत नाहीत आणि पोलिसही त्यांची तक्रार घेत नाहीत, असाही आरोप घोसाळकर यांनी करत आमदार सुर्वेंचे नाव एफआयआरमध्ये समाविष्ट करावे, अशी मागणी केली. त्यावर चौकशी सुरु असल्याचे उत्तर जैन यांनी त्यांना दिले.

आम्हाला आत टाकता, त्यांना का नाही?

आमदार सुर्वे शिवसैनिकांचे हातपाय तोडून कोथळा बाहेर काढण्यापर्यंत चिथावणीखोर भाषण करतो. तर त्यांचा लेक हा व्यावसायिकाला शस्त्र दाखवत त्याचे अपहरण करतो. हे सगळे प्रकार आमदार पदाची ताकद वापरून होत आहेत. आम्हाला कायदा दाखवता, आत टाकता, मग त्यांच्यावर कारवाई का करत नाही. - विनोद घोसाळकर, माजी आमदार. 

टॅग्स :प्रकाश सुर्वेशिवसेना