स्मारक सामान्यांसाठी खुले का करत नाही - मनसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 07:00 AM2020-11-18T07:00:50+5:302020-11-18T07:01:09+5:30
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी मनसेने स्मारकावरून शिवसेनेवर निशाणा साधला.
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील नियोजित स्मारकासाठी फक्त जागा घेतली आहे. मात्र अद्याप त्या ठिकाणी स्मारक का उभारलेले नाही, असा प्रश्न उपस्थित करतानाच खासगी मालमत्ता असल्याप्रमाणे या जागेचा वापर होत असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी मनसेने स्मारकावरून शिवसेनेवर निशाणा साधला. शिवाजी पार्क जवळील महापौर निवासाच्या जागेवर स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महापौर बंगला रिकामा करत महपौरांचे निवासस्थान भायखळ्यात हलविण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती जपण्यासाठी शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थानाच्या जागेवर भव्य स्मारक उभारले जाणार आहे. यासाठी तीन वर्षांपूर्वी महापौर बंगला हस्तांतरित करण्यात आला. मात्र अजूनही तो बंदिस्त आहे. आत डोकावताही येत नाही, अशा पद्धतीने पत्रे मारले आहेत. बाळासाहेबांच्या स्मारकाचे पुढे काय झाले, असा प्रश्न करतानाच बाळासाहेबांचा स्मृतिदिन किंवा जयंती आली की टेंडर काढले आहे, काम सुरू आहे हेच दरवर्षी सांगितले जाते. पुढे त्याचे काय झाले काहीही समजत नाही. जर, स्मारक असेल तर ते बंदिस्त का आहे, ते सर्वसामान्यांसाठी खुले का नाही, जनता तिथे का जाऊ शकत नाही, कोणाची तरी खासगी मालमत्ता असल्याप्रमाणे या जागेचा वापर का होत आहे, असे प्रश्न उपस्थित करतानाच स्मारक आहे की मातोश्री तीन, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला.
‘काहींची विधाने अनुलेखाने मारण्याजोगी’
ज्यांनी बाळासाहेबांच्या हयातीत शिवसेना सोडली त्यांना स्मारकाचा प्रश्न उपस्थित करण्याचा हक्क नाही, अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मनसेला फटकारले आहे. कोणाला किती महत्त्व द्यायचे याची शिकवण आम्हाला बाळासाहेबांनी दिली आहे. काही लोक आणि त्यांची विधाने अनुलेखाने मारण्याजोगीच असतात, असा टोला राऊत यांनी लगावला.