Join us

मुंबईकरांचे १६०० कोटी समुद्रात का टाकताय - मरोली प्रकल्पावर भाजपचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 4:18 AM

मुंबई : समुद्राचे पाणी गोड करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने मरोली येथील १६०० कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी दिल्यानंतर आता भाजपकडून प्रकल्पावर ...

मुंबई : समुद्राचे पाणी गोड करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने मरोली येथील १६०० कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी दिल्यानंतर आता भाजपकडून प्रकल्पावर टीका केली जात आहे. मुंबईतील पाणीपुरवठ्यातील गळती थांबवली तरी रोज चारशे दशलक्ष लीटर पाण्याची बचत होईल. त्यामुळे दोनशे लीटरसाठी मुंबईकरांचे १६०० कोटी ‘समुद्रात’ का टाकताय, असा प्रश्न भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने या निर्णयाचा पुर्नविचार करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

समुद्राचे खारे पाणी गोड करून पिण्यासाठी उपलब्ध करून देण्याच्या मनोरी येथील प्रकल्पाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मंजुरी दिली होती. १६०० कोटींच्या या प्रकल्पातून रोज २०० लीटर पाणी गोड करण्याची योजना आहे. मात्र, पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाची गरज आहे का, हा महागडा प्रकल्प न्याय्य आहे का, असा प्रश्न उपस्थित करतानाच जर १६०० कोटींच्या तुलनेत ४० टक्के खर्चात मुंबईतील सध्याची गळती थांबली तर रोज २०० दशलक्ष लीटरच्या दुप्पट पाणी वाचेल, असा दावा शेलार यांनी केला.

याबाबतची आकडेवारी देत शेलार म्हणाले की, मुंबईचा दररोजचा पाणीपुरवठा ३८०० दशलक्ष लीटर इतका आहे. तर, मुंबईत गळतीमुळे रोज वाया जाणारे पाणी सुमारे ९०० दशलक्ष लीटर इतके आहे. पालिका आणि आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे कमीत कमी दहा टक्के म्हणजेच ३८० दशलक्ष लीटर पाण्याची गळती सहज थांबवता येते. पालिकेच्या एच/वेस्ट प्रभागात, एक पथदर्शी कार्यक्रम राबवून एका वर्षात गळतीने वाया जाणारे १०० कोटी लीटर पाणी वाचवले. पालिका सर्व २४ प्रभागांत असा प्रयत्न करून वाया जाणारे पाणी का वाचवत नाहीत, मुंबईकरांचे १६०० कोटी ‘समुद्रात’ का टाकताय, कोणाच्या फायद्यासाठी निर्णय घेतला आहे, असा प्रश्न शेलार यांनी केला.