मुंबई : कोरोनावरील लस न घेतलेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करण्यास मनाई का करण्यात आली आहे, याची पटणारी कारणे द्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बुधवारी दिले. लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्याची वेळ येते, त्यावेळी लसवंत व लस न घेतलेले असे विभाजन का केले आहे? याचे स्पष्टीकरण देणारे प्रतिज्ञापत्र २१ डिसेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने मुख्य सचिवांना दिले.
लोकल प्रवासासाठी लस घेणे बंधनकारक करण्याच्या सरकारच्या निर्णयाला दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत आहे, असे याचिकांमध्ये म्हटले आहे. या याचिकांवरील सुनावणीत राज्य सरकारने स्पष्ट केले की, या निर्णयाद्वारे राज्य सरकारने नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केले नाही. केवळ लोकलने प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. लस न घेतलेल्या लोकांना खासगी वाहनांनी प्रवास करण्याची मुभा आहे.
लोकांच्या गैरसोयीसाठी कोरोनासंबंधी निर्बंध घातले नाहीत. तर कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून खबरदारीच्या उपाययोजना आखल्या आहेत. नागरिकांचे कोरोनापासून संरक्षण करणे, हाच यामागे उद्देश आहे, असे राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ वकील अनिल अंतुरकर यांनी सांगितले. ‘उपनगरीय रेल्वे सेवेचा लाभ न घेता येणाऱ्या नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणण्याचा मुद्दा उपस्थित झाला. त्याचे स्पष्टीकरण सरकार आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिले पाहिजे,’ असे न्यायालयाने म्हटले.विभाजन का केले?लोकल प्रवासासाठी मुभा देण्याकरिता लसवंत व लस न घेतलेले असे नागरिकांचे विभाजन का करण्यात आले आहे? हे पटवून देणारी कारणे राज्याच्या मुख्य सचिवांनी प्रतिज्ञापत्राद्वारे द्यावीत,’ असे निर्देश देत न्यायालयाने पुढील सुनावणी २२ डिसेंबर रोजी ठेवली आहे.