कर नाही तर डर कशाला?
By admin | Published: July 25, 2015 01:20 AM2015-07-25T01:20:47+5:302015-07-25T01:20:47+5:30
केवळ आरोपांच्या भरवशावर राजीनामे द्यायचे म्हटले तर विरोधी पक्षातील अर्ध्या लोकांना बाहेर जावे लागेल, असा प्रतिहल्ला करीत मुख्यमंत्री
मुंबई : केवळ आरोपांच्या भरवशावर राजीनामे द्यायचे म्हटले तर विरोधी पक्षातील अर्ध्या लोकांना बाहेर जावे लागेल, असा प्रतिहल्ला करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपांच्या वादळात सापडलेल्या आपल्या मंत्र्यांचा आज विधानसभेत बचाव केला.
आपल्या मंत्र्यांवरील आरोपांवरून विरोधक निव्वळ राजकारण करीत आहेत. अकारण वाद निर्माण केला जात नाही. कोणत्याही खरेदीत भ्रष्टाचार झालेला नाही; केवळ राजकारण सुरू आहे. उच्च न्यायालयालादेखील चुकीचे कोट केले जात आहे. तुम्ही आरोप करता म्हणून आमचे मंत्री राजीनामे देतील हे शक्य होणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. ज्यांच्यावर १५ वर्षांच्या सत्ताकाळात आरोपांची अक्षरश: राळ उठली ते आम्हाला नैतिकता शिकवायला निघाले आहेत. रेट कॉन्ट्रॅक्टच्या आधारे ज्यांनी हजारो कोटींची खरेदी केली ते आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. घोटाळेबाजांना बोलण्याचा अधिकारच नाही. आम्ही पारदर्शक आहोत आणि आमचा कारभारही पारदर्शक आहे, असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावले.
शिवसेना तटस्थ
विरोधी पक्षांकडून सत्तापक्षावर हल्लाबोल सुरू असताना शिवसेनेचे बहुसंख्य सदस्य सभागृहात नव्हते. जे होते ते जागेवरच बसून होते. केवळ भाजपाचे सदस्य वेलमध्ये उतरले.